मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मीराबाग येथील जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शुक्रवारी शेकडो आंदोलकांनी अचानक मडगावच्या लोहिया मैदानावर धडक दिली. या घटनेमुळे दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
लोहिया मैदानाच्या वापरासाठी तसेच लाऊडस्पीकर वापरण्यासाठी आवश्यक परवानगी न मिळाल्याने पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे संकेत भंडारी यांच्यासह शेकडो महिला व ज्येष्ठ नागरिकांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत पोलिसांच्या बसमध्ये बसून 'जेल भरो' आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
दरम्यान, विधानसभेतून अटक करण्यात आलेल्या चार आंदोलकांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी सायंकाळपर्यंत मडगाव पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केले. याचवेळी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी या बंधाऱ्याच्या प्रस्तावामागे स्थानिक आमदार गणेश गावकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मीराबाग येथील बंधाऱ्याच्या मुद्यावरून सावर्डे मतदारसंघातील शेकडो ग्रामस्थ शुक्रवारी मडगावच्या लोहिया मैदानावर दाखल झाले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, माजी मंत्री दीपक पाऊसकर, काँग्रेस गटाध्यक्ष संकेत भंडारी, गौतम भंडारी, असोल्डा येथील जेटी चळवळीचे नेते दत्तराज गावस देसाई तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनात गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक घरांतील सदस्य मुलांच्या परीक्षा सुरू असूनही आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, लोहिया मैदानाच्या वापरासाठी आवश्यक परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी आंदोलनाला आक्षेप घेतला. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने मोर्चाला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते. सरकारविरोधी राजकीय पक्ष, विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने आंदोलन चिघळल्यास राज्यभर त्याचे परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.