Primary Teachers AI
गोवा

YouTube Subscription Scam | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अन् 'लकी विनर' व्हा! मडगावातील कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षिकेचा अजब कारनामा

YouTube Subscription Scam | मडगावातील कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षिकेचा प्रताप ; पालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगावातील एका कॉन्व्हेंट शाळेत पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सोशल मीडिया चॅनलचा आधार घेण्यास सांगून नियमित अध्यापनाऐवजी विद्यार्थ्यांना उर्वरित धडे व कवितांचा स्वयंअभ्यास ('सेल्फ स्टडी') करण्यास सांगण्यात आल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित शिक्षिकेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगतानाच 'लकी विनर' ठरणाऱ्या विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभ्यासाच्या नावावर स्वतःचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याचे आमिष दाखविणाऱ्या या शिक्षिकेच्या कारनाम्याबाबत मोठी चर्चा पालकवर्गात होत असून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचवीच्या आगामी परीक्षेत स्थानिक भाषेच्या विषयात धडे व कविता, व्याकरणाच्या अभ्यासाचा समावेश आहे. त्यापैकी केवळ एक धडा सविस्तर शिकवून प्रश्नोत्तरे देण्यात आली असून उर्वरित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यासावा, असे संबंधित शिक्षिकेने सांगितल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

अडचण आल्यास शिक्षिकेच्या यूट्यूब चॅनलवरून माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच चॅनलला 'लाईक' व 'सबस्क्राईब' करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले आहे. पाचवीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नावाखाली सोशल मीडिया चॅनलला जोडण्याचा आग्रह त्या शिक्षिकेने धरला आहे.

शिक्षणासाठी सोशल मीडिया पूरक माध्यम म्हणून वापरण्याऐवजी अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून चॅनलचे सबस्क्रिप्शन मिळविण्यासाठी अशा प्रकारचे आमिष दाखविले गेले असल्यास, हा प्रकार गंभीर असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. शाळेच्या नियमित अध्यापनाच्या चौकटीत विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने सोशल मीडिया चॅनलकडे वळविणे कितपत योग्य आहे, याबाबत आता पालक आणि शाळा प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

"शालेय शिक्षणात इयत्ता पाचवीच्या वर्गात असा प्रकार शिक्षकाकडून अपेक्षित नाही. यावर सखोल चौकशी केली जाणार आहे."
- भगीरथ शेट्ये (अध्यक्ष, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT