पणजी : पुढारी वृत्तसेवा
नियोजित व जबाबदार पर्यटन अनुभवांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि पर्यटन विभाग, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लोकभवन मार्गदर्शित पर्यटन फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीतून पर्यटकांना लोकभवन परिसरातील वारसा, वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याची संधी देण्यात आली.
गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू आणि गोव्याच्या प्रथम महिला सुनीला राजू यांनी, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे या फेरीचा शुभारंभ केला. यावेळी राज्यपालांचे सचिव अर्जुन मोहन (आयएएस), जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गॅविन डायस, उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर, राजभवनाचे नियंत्रक ए. के. हर्ष, सोल ट्रॅव्हलिंगचे संस्थापक वरुण हेगडे, विविध हॉटेल्सचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, या मार्गदर्शित फेरीमुळे पर्यटकांना लोक भवन परिसराशी संबंधित वारसा, वातावरण आणि मूल्ये समजून घेण्याची व त्याचा आदर करण्याची संधी मिळणार आहे. जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांनी सांगितले की, पर्यटकांना सुलभ, माहितीपूर्ण आणि सन्मानजनक अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.
मार्गदर्शित फेऱ्या अनुभवाधारित पर्यटनावर वाढता भर दर्शवतात. यामुळे पर्यटकांना वारसा आणि पर्यावरण यांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि जबाबदार पर्यटनाला चालना मिळते.- केदार नाईक, संचालक, पर्यटन खाते
लोक भवनसारख्या ठिकाणांसाठी पर्यटन फेऱ्या राबविल्याने गोव्याचा वारसा आणि निसर्ग शिस्तबद्ध व अर्थपूर्ण पद्धतीने सादर करता येतो. यामुळे पर्यटक सार्वजनिक स्थळांशी जबाबदारीने जोडले जातात आणि गोव्याच्या सांस्कृतिक व पर्यावरणीय संपत्तीबाबत जागरूकता वाढते.रोहन खंवटे, मंत्री, पर्यटन खाते