पणजी : पुढारी वृत्तसेवा: राज्यात सध्या भाजप सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करत असून त्यांचे सरकार स्थिर आहे. त्यांच्या नेतृत्व बदलाविषयी जोरदार चर्चा आहेत. मात्र, त्यांच्या नेतृत्व बदलांची चर्चा निरर्थक असून यात कोणताच बदल होणार नाही. याशिवाय मंत्रिमंडळ फेरबदलाविषयीही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज (दि.२३) दिली. (Goa Politics)
खासदार तानावडे पुढे म्हणाले की, राज्यात नेतृत्व बदलाविषयी विविध चर्चा ऐकू येतात. त्यात पक्षाचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, सभापती रमेश तवडकर यांची नावे घेतली जात आहेत. अर्थात या सर्व चर्चा निरर्थक असून, सध्या तरी कोणत्याही प्रकारचा नेतृत्व बदल होणार नाही. याशिवाय मंत्रिमंडळ फेरबदलाविषयीही गेल्या अनेक दिवसांपासून अशाच प्रकारच्या चर्चा होत आहेत. यातही काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी नवीन आमदारांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. याबाबत केंद्रीय समिती राज्य समितीशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांना तशी विनंती करेल, आणि त्यानंतरच निर्णय होईल. सद्या या फेरबदलाविषयी केंद्रीय नेतृत्वाकडून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असेही तानावडे म्हणाले. (Goa Politics)