

पणजी: पुढारी वृत्तसेवा : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून भारतीय राखीव दलाचा (आयआरबी) पोलीस अमित नाईक यांच्या मदतीने फरार झालेला सराईत गुंड सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला (Siddiqui Arrested) गोवा पोलिसांनी (Goa Police) केरळ पोलिसांच्या मदतीने केरळमधून दोन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. केरळ पोलिसांच्या अन्य फॉर्मलिटीजमुळे त्याला अटक केल्याचे आज (दि.२३) जाहीर केले आहे. त्याला आज गोव्यात आणून त्याची पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, यापूर्वी आपल्याच सरकारने सुलेमानला अटक केली होती, आणि आताही आमच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यादरम्यानच्या काळात जे विरोधक बोलत होते, त्यांना पोलिसांची ताकद कळाली असेल. या दरम्यान त्याने कोणाकोणाची संपर्क केला. या सर्वांची चौकशी केली जाईल. सुलेमान याने पुणे, दिल्ली सारख्या अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे केले आहेत. त्याचीही माहिती घेतली जाईल. आमच्या सरकारकडून चोर, जमीन माफिया असे गुन्हेगार सुटणार नाहीत. (Siddiqui Arrested)
सिद्दीकी (Siddiqui Arrested) जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी असून ४ राज्यात त्याच्यावर पंधराहून अधिक गुन्हे नोंद आहेत. यात खून, मारामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, धमकावून पैसे गोळा करणे, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन हडप करणे, खंडणी गोळा करणे अशा स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. यापूर्वी त्याला तीन गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर झाला होता. सध्या म्हापसा येथे जमीन हडप केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक करून गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. तिथून तो १३ डिसेंबर रोजी फरार झाला होता.
दरम्यान, सिद्दीकी (Siddiqui Arrested) यानी आणखी एक दुसरा व्हिडिओ वायरल करत त्यात त्याचा वकील आणि आम आदमी पक्षाचा पक्षाचे समन्वयक अॅड. अमित पालेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पालेकर यांनीच आपल्याला राजकर्त्यांची नाव घेऊन आरोप करण्यास सांगितले होते, असा आरोप त्याने केला आहे. आज सोमवार सकाळपासून जुने गोवे पोलिसांकडून अॅड. अमित पालेकर यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून याबाबतचे त्यांचे सविस्तर स्टेटमेंट ( मत) लिहून घेण्यात येत आहेत.