पेडणे : निवृत्ती शिरोडकर
राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि कोणीही कायमचा शत्रू नसतो, या उक्तीचा प्रत्यय सध्या मांद्रे विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींमधून येत आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे हे एकेकाळी एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते विविध कार्यक्रमांत एकत्र दिसू लागल्याने मांद्रेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
मांद्रे मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता येथे मतदारांनी सातत्याने वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली आहे. त्यामुळे कोणत्याच एका पक्षाची या मतदारसंघावर कायमस्वरूपी मक्तेदारी राहिलेली नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ॲड. रमाकांत खलप यांनी १९७७, १९८०, १९८४ आणि १९८९ मध्ये सलग विजय मिळवत मगोचा बालेकिल्ला मजबूत केला होता. १९९४ मध्ये काँग्रेसच्या संगीता परब यांनी खलप यांचा पराभव केला. त्यानंतर १९९९ मध्ये खलप यांनी पुन्हा विजय मिळवला.
२००२ पासून प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रेत भाजपची पकड मजबूत केली. त्यांनी २००२, २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. पुढे ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मांद्रेतील भाजपच्या संघटनात्मक विस्तारात पार्सेकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
मात्र, २०१७ मध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला. काँग्रेसचे दयानंद सोपटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांचा ७,११९ मतांनी पराभव केला.
सोपटे यांना १६,४९०, तर पार्सेकर यांना ९,३७१ मते मिळाली. त्यानंतर २०१८ मध्ये सोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी १३,४६८ मते मिळवत ४,९२५ मतांनी विजय मिळवला.
२०२२ मध्ये पुन्हा समीकरण बदलले. मगोचे जीत आरोलकर यांनी १०,३८७ मते मिळवत भाजपच्या सोपटे यांचा ७१५ मतांनी पराभव केला. सोपटे यांना ९,६७२ मते मिळाली. त्यामुळे सध्या मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आरोलकर करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर पार्सेकर आणि सोपटे यांची वाढती जवळीक भाजपसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र समर्थक, दीर्घ राजकीय अनुभव आणि मतदारसंघातील जनसंपर्क पाहता त्यांची एकजूट झाल्यास भाजपची संघटनात्मक ताकद वाढू शकते. यापूर्वी दोन्ही गटांमध्ये झालेली विभागणी पक्षासाठी अडचणीची ठरल्याची चर्चा होती.
मात्र पार्सेकर-सोपटे एकत्र आले म्हणजे भाजपचा विजय निश्चित, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. विद्यमान आमदार जीत आरोलकर यांची मगोची संघटनात्मक ताकद, स्थानिक जनसंपर्क आणि मागील निवडणुकीतील विजय हेही महत्त्वाचे घटक आहेत.
आगामी काळात भाजपची उमेदवारी कोणाला मिळते, दुसरा नेता त्याला कितपत साथ देतो आणि दोन्ही नेत्यांचे समर्थक कार्यकर्ते खरोखरच एकत्र येतात का, यावर मांद्रेतील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पार्सेकर-सोपटे यांची जवळीक केवळ राजकीय कार्यक्रमापुरती मर्यादित राहते की ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातही दिसते, याकडे मांद्रेवासीयांचे लक्ष लागले आहे.