प्रभाकर धुरी
पणजी
सापांचा राजा असलेला आणि राजासारखा जगणारा किंग कोब्रा झपाट्याने जंगल कमी होऊन लागल्याने मानवी वस्तीत आढळू लागला आहे.निसर्गाच्या साखळीत किंग कोब्राचे स्थान अनन्यसाधारण असल्याने अनेक सर्पमित्र त्याला वाचवण्यासाठी जनजागृती करत आहेत.त्याचा परिणाम म्हणून पश्चिम घाटात त्याची संख्या अधिक आढळते.इतके दिवस गोवा आणि सिंधुदुर्गात सहज आढळणारा किंग कोब्रा आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड,आजरा भागातही दिसत आहे. अज्ञान आणि भीतीपोटी होणाऱ्या हत्या थांबल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
किंग कोब्रा हा सर्व सापांचा राजा असल्याने त्याला नागराज असे म्हणतात. तो साप खात असल्याने त्याची प्रजाती ऑफिओफॅगस म्हणून ओळखली जाते. धामण,लहान अजगर,सर्व विषारी साप,घोरपड,सरडे आणि क्वचितप्रसंगी किंग कोब्राही तो खातो.
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब आणि विषारी साप आहे. तो सरासरी १० ते १३ फूट लांब असतो.तथापि, तो २० फुटापर्यंतही वाढू शकतो.आतापर्यंत १८.५ फूट इतक्या लांबीची नोंद आढळते.
गोव्यात २००२ मध्ये सर्पमित्र अमृत सिंग यांनी पहिला किंग कोब्रा पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. गवाणे सत्तरी येथे घोरपडीच्या मागून तो एका मातीच्या घरात आला होता.लोकांना घाबरून तो भिंतीवर चढला.त्याला बंदुकीने मारण्यासाठी एकजण काडतूस विचारायला गेला.तिथे अमृत सिंग सोबत काम करणारे डॉ.राजेश केणी होते.त्यांनी ही गोष्ट सिंग यांना सांगताच ते तातडीने गेले आणि त्या किंग कोब्राचा जीव वाचवला.आता सिंग यांनी गोव्यात सर्पमित्रांचे जाळे तयार केले असून मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे किंग कोब्राला मारणाऱ्यांपेक्षा वाचवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सिंग यांनी झाडावर बसलेल्या एका किंग कोब्रालाही पकडून जंगलात सोडले होते
किंग कोब्रा मनुष्य वस्तीजवळ का आढळतो ?
पारंपारिक शेती सोडून गावागावात कॅश क्रॉप समजली जाणारी काजू,अननस,रबर शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली.देवराया संपवण्यात आल्या.यातून किंग कोब्रांचा नैसर्गिक अधिवास संपला. शिवाय पिकांवर रासायनिक फवारणी होऊ लागली.त्यामुळे अनेक कीटक, उंदीर, सरपटणारे प्राणी, साप मानवी वस्तीकडे आले.त्यांना खाण्यासाठी मग जंगलचा राजा मानवी वस्तीजवळ आला.उन्हाळ्यात जंगलातील पाणी संपले की, किंग कोब्रा पाण्यासाठी मानवी वस्तीजवळच्या पाणवठ्यावर येतो.
दोडामार्गमध्ये चौघांची सुटका, दोघांचे दर्शन
सिंधुदुर्गातील तळकट, असनिये, झोळंबे, कोलझर (ता.दोडामार्ग ) या परिसरात माड पोफळीच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहे.त्यात नियमित पाणी असते.त्यामुळे त्या भागात किंग कोब्राचा आढळ अधिक आहे. झोळंबे येथील सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी शिरवल, तळकट, झोळंबे येथे ३ , तर सिंग यांच्या सहकार्याने झोळंबे येथे एक असे ४ किंग कोब्रा पकडून अधिवासात सोडले. सध्या असनिये येथे १ , तर कोलझर परिसरात 1 असे २ किंग कोब्रा दिसत आहेत. त्यांचा वावर आसपासच्या ४ - ५ किलोमीटर परिसरात असणार आहे.
कोब्रा आणि किंग कोब्रा यातील फरक
- नागाची (कोब्रा) लांबी ६ ते ७ फूट तर किंग कोब्राची लांबी ११ ते १३ फूट
- एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी नागाचे ३० मिलीग्रॅम,तर किंग कोब्राचे ५६ मिलीग्रॅम विष पुरेसे
- नागाच्या विषाच्या पिशवीत २५० मिलीग्रॅम विष असते, किंग कोब्राच्या पिशवीत ७,००० मिलीग्रॅम (७ मि.ली) विष असते
- किंग कोब्रा एका दंशावेळी ३८० ते ६०० मिलिग्रॅम विष सोडतो. किंग कोब्राचे दात त्वचेत १.२५ ते १.५० सेंटीमीटर घुसतात.
- किंग कोब्रा चावला तर किमान १५ मिनिटांत माणूस मरू शकतो.
- कोब्रा चावल्यास प्रतिविष (अँटी व्हेनम ) उपलब्ध आहे.त्यामुळे माणूस वाचण्याची शक्यता अधिक असते.
- किंग कोब्राचे अँटी व्हेनम सहज उपलब्ध नाही.त्यामुळे माणूस वाचण्याची शक्यता फार थोडी असते.
रेल्वे, मालवाहक ट्रकांमधून सापांचे स्थलांतर
किंग कोब्रा कितीही विषारी असला तरी, तो शांत स्वभावाचा आहे. तो पटकन आक्रमण करत नाही.४ वर्षांपूर्वी कर्नाटकात ७० वर्षाच्या सर्पमित्राचा मृत्यू वगळता, तो चावल्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण नगण्य आहे .कर्नाटकचा किंग कोब्रा वाहनातून वास्कोत आला होता.बंगाल ,आसाम मधील पॅराडाइज फ्लाइंग स्नेक ठाणे - महाराष्ट्रात ,तर सिलोन कॅट स्नेक श्रीलंकेतून गोव्यात पोचला होता.अनेक ठिकाणी वाहनांतून सापांचे स्थलांतर होते, त्यामुळेही त्यांचा विस्तार वाढतो,अशी माहिती अमृत सिंग यांनी दिली.
पूर्वी व्हायची किंग कोब्राची शिकार !
सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात कोलझर, झोळंबे,तळकट परिसरात २० वर्षांपूर्वी ५ किंग कोब्रा मारण्यात आले होते.त्यातील दोन मिलनाच्या काळात मारण्यात आले होते.तसेच केर परिसरातही एक सर्वाधिक लांबीचा किंग कोब्रा मारण्यात आला होता.त्याकाळी सगळे किंग कोब्रा भीती आणि अज्ञानापोटी बंदुकीच्या गोळीने मारले जायचे. आता जनजागृती होत असल्याने किंग कोब्रांची संख्या वाढली आहे,पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने ही बाब दिलासादायक आहे.
घरटे बांधणारा किंग कोब्रा जगातील पहिला साप
अंडी घालण्यासाठी जमिनीवर घरटे बांधणारा वैशिष्टपूर्ण किंग कोब्रा हा जगातील पहिला साप आहे. मादी सुकलेला पालापाचोळा आपल्या शेपटीने गोळा करून घरटे बांधते.साधारणपणे ती १५ ते ३० अंडी घालते.पिल्ले बाहेर यायला ६० ते ७० दिवस लागतात. या काळात नर किंग कोब्रा झाडावर बसून अंड्यांची देखरेख करत असतो. नागापेक्षा किंग कोब्राची नजर तीक्ष्ण असते.
... म्हणून किंग कोब्रांची संख्या वाढली
पूर्वी साप दिसला की,मागचा पुढचा विचार न करता भीतीपोटी त्याला मारले जायचे.आपल्या आयुष्यात सापाचे काय महत्त्व आहे हे त्यांना कळत नव्हते. किंग कोब्रा हा तर लांबीने आणि देहाने मोठा,त्यामुळे त्याला बंदुकीने मारले जायचे. सर्पमित्रांकडून जनजागृती सुरू झाली आणि लोकांची भीती कमी झाली.आता नाग असो किंवा नागराज,लोकांना दिसला की ते सर्पमित्रांना बोलावतात. ते येतात आणि त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात.यामुळे किंग कोब्रांची संख्या अलीकडे वाढली आहे.