goa congress 
गोवा

Goa Congress | वेणुगोपाल आले आणि गेले; परिस्थिती जैसे थे

Goa Congress | चोडणकर यांच्याच सोबत काम करण्याचा संदेश : असंतुष्टांच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पक्षातील नाराजांचा सूर जुळविण्यासाठी आणि असंतुष्टांना शांत करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल गोव्यात आले खरे, मात्र असंतुष्टांमधील धुसफूस कायम राहिली. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासोबतच तुम्हाला काम करावे लागेल, असा संदेश दिल्याचे समजते. त्यामुळे आता असंतुष्ट गट कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गोवा काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष, गटबाजी आणि 'नवा गोवा काँग्रेस पक्ष' या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांनी गोव्याचा दौरा करून वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. पक्ष संघटना मजबूत करणे, काँग्रेसमध्ये एकजूट राखणे आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर करणे, हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता.

काँग्रेसमध्ये पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य असून अंतर्गत मतभेद आणि तक्रारी सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडण्याऐवजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडाव्यात, अशा स्पष्ट सूचना काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गोव्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. बैठकीत बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, पक्षातील मतभेद सार्वजनिकपणे व्यक्त करू नयेत. पक्षाचे निर्णय मान्य नसतील तर त्याबाबत पक्षश्रेष्ठींसमोर चर्चा करावी. पक्षाची प्रतिमा मलिन होईल, अशा कोणत्याही कृतीपासून कार्यकर्त्यांनी दूर राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकसंध राहिल्यास काँग्रेसचे सरकार निश्चित येणार...

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकसंघ राहून बूथस्तरावर संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा. काँग्रेसने गोव्याच्या विकासासाठी दिलेले योगदान जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करून जनसंपर्क वाढवा. पक्षशिस्त पाळून सर्वांनी एकदिलाने काम केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार निश्चित सत्तेवर येईल, असा विश्वास के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला

काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान निलंबित; राज्य समितीही बरखास्त

अखिल काँग्रेस भारतीय समितीने (एआयसीसी) गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या (जीपीसीसी) अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन केले असून, अल्पसंख्याक विभागाची राज्य समितीही बरखास्त केली आहे. गैरशिस्त आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तथा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

वसीम खान तसेच नझीर खान यांची गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाचे संयोजक म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्त्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकीत वसीम खान यांनी, 'अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर बोलणार नसाल, तर अल्पसंख्याक विभाग बंद करून टाका,' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT