

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नव्याने स्थापन झालेल्या गोवा काँग्रेस पक्षाचा एकमेव उद्देश विरोधी पक्षांची मते विभागणे आणि अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा मिळवून देणे हा आहे. काँग्रेसचा कोणत कोणताही नेता या नव्या पक्षाशी संबंधित नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. ठाकरे म्हणाले की, काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे दावे खोटे असून ते मी फेटाळून लावत आहे.
पक्ष मजबूत करण्यासाठी आणि भाजपला विरोध करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कोणाशीही काँग्रेस चर्चेसाठी तयार आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजप नव्या पक्षांचा वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. भूरूपांतरण आणि जमिनीची विक्री यांसारख्या मुद्द्यांवरून काँग्रेसने सरकारविरोधात प्रचार तीव्र केल्यामुळे भाजपने ही रणनीती अवलंबिली आहे.
गत निवडणुकीतही अशीच युक्ती भाजपने वापरली होती, असेही आलेमाव म्हणाले. विध्वंसक डावपेचांनी भाजप काँग्रेसची प्रतिमा मलीन करू शकत नाही, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. काँग्रेस भाजपविरोधी मोहिमेवर लक्ष केंद्रित करून आहे आणि सत्ताधारी पक्षाविरुद्धचा लढा सुरूच ठेवेल, असेही ते म्हणाले.
'गोवा काँग्रेस पक्ष' स्थापनेमागे भाजपचा हात
'गोवा काँग्रेस पक्ष' स्थापनेमागे भाजपचा हात आहे, असा आरोप काँग्रेसच्या गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. नवीन 'गोवा काँग्रेस' पक्षाची नोंदणी हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि भाजपविरोधी मतांचे विभाजन करण्याचा भाजप-समर्थित प्रयत्न आहे.
या पक्षाशी संबंधित असलेले लोक अंजली निंबाळकर काँग्रेसचे सक्रिय सदस्य नाहीत आणि गरज पडल्यास पक्ष कायदेशीर पर्यायांचा विचार करेल, असेही निंबाळकर म्हणाल्या. एका प्रश्नावर निंबाळकर म्हणाल्या की, माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी पूर्वीप्रमाणेच सर्वांचे संबंध आहेत. नव्या पक्षाशी आमचे कुणीही सदस्य जोडले गेलेले नाहीत. मात्र, ज्यांना जायचे असेल त्यांना थांबवणे कठीण आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले आहे की, आमच्यासोबत रस्त्यावर उतरून जनतेसाठी काम करायचे असेल त्यांनी आमच्यासोबत यावे आणि ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे.
काँग्रेसला मतदार 'भाणशिरे' वाटतात; अल्पसंख्याक नाराज
गिरीश चोडणकर यांना ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नियुक्त केल्याबद्दल विशेषतः काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेला अल्पसंख्याक मतदार नाराज झाला आहे. याबाबत ख्रिश्चन समाज संघटनेच्या वतीने व्यक्त होणारे फादर एरमितो रिबेलो यांनी एक व्हिडीओ काढून याबद्दल नाराजी व्यक्त केली असून आम्ही मतदार काँग्रेसला 'भाणशिरे' (स्वयंपाक घरातील हातपुसणे) वाटतो की काय, असा प्रश्न उपस्थित केला.
फादर रिबेलो व्हिडीओत म्हणतात की, चोडणकर हे बदनाम व्यक्तिमत्व आहे. तामिळनाडूमध्ये आणि पाँडिचेरीमध्ये उमेदवारीसाठी त्यांनी पैसे घेतल्याचा तेथील नेत्यांचा आरोप आहे. एवढे असूनही तामिळनाडूत काँग्रेसचे १८ आमदार होते ती संख्या ५ वर आली, तर पाँडिचेरीमध्ये ६ आमदार होते; ते आता १ वर आणले. गोव्यात तर २०१७ मध्ये चोडणकर अध्यक्ष असतानाच निवडणुकीनंतर तब्बल १० आमदार फुटले. २०२२ मध्येही गिरीश चोडणकर अध्यक्ष असतानाच निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे ८ आमदार फुटले.
उमेदवारी वाटपात पैशांचा वापर केल्याचे आरोप होत असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसला मते द्यावीत की नाही याबाबत अल्पसंख्याक मतदार निश्चितपणे विचार करेल, असा इशाराच फादर रिबेलो यांनी दिला आहे. गोवा काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन होतोय. गिरीशला अध्यक्ष केल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस जनांचा हा पक्ष असेल आणि त्यात गोव्याच्या मातीशी इमान राखणाऱ्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांचा समावेश राहिला तर आम्ही निश्चितपणे त्याला मते देण्याबाबत विचार करू शकतो, असेही रिबेलो यांनी म्हटले आहे