पणजी : पुढारी वृत्तसेवा
कझाकस्तानच्या अलमाटीहून १७७ प्रवाशांना घेऊन पहिले चार्टर विमान सोमवारी मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे गोव्याच्या हिवाळी पर्यटन हंगामाला आता आणखी गती मिळाली आहे.
पर्यटन खात्यातर्फे विमानातून आलेल्या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख परदेशी बाजारपेठांमधून पर्यटकांना आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाइट्समुळे गोवा हिवाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज होत आहे. इतर विमानतळांमार्फत गोव्यासाठी चार्टर फ्लाइट्स आधीच सुरू असले तरी, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हे या हंगामातील पहिले चार्टर फ्लाइट आहे.
याबाबत पर्यटन मंत्री, रोहन खंवटे म्हणाले की, अलमाटीहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या चार्टर विमानाचे आगमन ही एक उत्साहवर्धक घडामोडी आहे. मोप येथील चार्टर कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे आगमन एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आमची पोहोच वाढवण्यावर आणि जगभरातील प्रवाशांना गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविध अनुभव आणि चांगल्या पाहुणचाराचा अनुभव दाखवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, असे पर्यटन मंत्री खंवटे यांनी सांगितले.