काणकोण पालिका कार्यालयाजवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती जाणून घेताना मंत्री डॉ. रमेश तचडकर 
गोवा

Kanakona Modern Fish Market Project |काणकोणात उभारणार सुसज्ज मासळी मार्केट

Kanakona Modern Fish Market Project- उद्या पायाभरणी; आंदोलनकर्त्यांना मंत्री डॉ. रमेश तवडकर यांचे चोख प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

  • जुन्या मासळी मार्केटच्या जागी होणार

  • इमारत सुमारे ३ कोटी १४ लाख रुपये खर्च

चावडी : काणकोण पालिका कार्यालयाजवळ असलेली मासळी बाजाराची जुनी इमारत मोडून तेथे नवीन बाजार प्रकल्प इमारत बांधण्याच्या कामाला काणकोणचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वा. पायाभरणी शुभारंभ होणार असून सुमारे ३ कोटी १४ लाख रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या बांधकामासंबंधी माहिती मंगळवारी पालिकेच्या सभागृहात देण्यात आली.

यावेळी मंत्री डॉ. रमेश तवडकर, जीसुडाचे अभियंते मुल्ला, कन्सल्टंट दत्ता कारे, पालिकेचे प्रशासक शंकर गावकर, माजी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, सायमन रेबेलो, नीतू देसाई, धीरज नाईक गावकर, नादिन फर्नांडिस, गंधेश मडगावकर, दिवाकर पागी, सिद्धार्थ देसाई, पालिका अभियंता दिलखुश गावकर, येसो देसाई, चंदन धुरी व इतर उपस्थित होते.

बोलताना डॉ. रमेश तवडकर यानी सांगितले की, या प्रकल्पासंबंधी आपण २०१७ पासून कामाला लागलो होतो. या प्रकल्पाची निविदा दोनवेळा काढण्यात आली; ती कुणीच घ्यायला तयार नव्हते, शेवटी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. एकट्यानेच ती निविदा मिळविली व आता त्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रशासक शंकर गावकर यांना घेराव घातला म्हणून हे काम सुरू होत आहे, अशा भ्रमात काँग्रेसच्या मिसरूट सुद्धा न फुटलेल्या व ज्यांना निविदा प्रक्रिया काय असते, याची माहिती नसलेल्या कार्यकर्त्यांनी जाणून घ्यावे, अशी टीका त्यांनी केली.

प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठीच होताहेत आंदोलने

राजबाग तारीर येथे पागी समाजातील ३ गरजूंना श्रमधाम योजनेतून घरे बांधून दिली आहेत. वैष्णव पेडणेकर या पागी समाजातील युवकाने तेथे फेरफटका सुद्धा मारला होता का? असा सवालही तवडकर यांनी केला. आता निवडणुका जवळ पोहोचल्या असून या बाजार प्रकल्पाच्या कामाचे श्रेय घेण्याकरिताच ही आंदोलने होत असल्याचा आरोप रमाकांत नाईक गावकर व गंधेश मडगावकर यांनी केला.

असे असेल प्रकल्पाचे स्वरूप

सुसज्ज असे बांधण्यात येणाऱ्या या मासळी बाजार प्रकल्पात ६० मासळी विक्रेत्या महिलांना बसण्याची व्यवस्था आहे. या प्रकल्पात ८ मोठी तर ८ छोटी दुकाने तसेच चिकन व मटन विक्रेत्यासाठी ८ दुकाने असतील. तसेच येथे कोल्ड स्टॉरेज सुद्धा असेल, अशी माहिती जीसुडाचे अभियंता मुल्ला यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT