पणजी : पुढारी वृत्तसेवा
कदंब महामंडळातील अनुकंपा तत्वावरील तब्बल ४८ नियुक्त्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती उघड झाली आहे. या अर्जादारांना तातडीने नौकरी देऊन त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक संकट दूर करावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सादर केलेल्या निवेदनात ताम्हणकर यांनी म्हटले आहे की, १९ फेब्रुवारी २०२० ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अनुकंपा तत्वावर नौकरीसाठी दाखल झालेले ४८ अर्ज अध्याप प्रलंबित आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधननंतर संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, हा अनुकंपा नियुक्ती योजनेचा मूळ उद्देश आहे. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे ही कुटुंबे आर्थिक विवंचनेत सापडली आहेत.
या विलंबामुळे त्यांच्या उपजीविकेच्या अधिकारावर आघात होत असल्याचा दावा ताम्हणकर यांनी केला. महामंडळातील उपलब्ध प्रशासकीय किंवा अन्य पदांवर पात्र अर्जदारांना तातडीने सामावून घ्यावे. आवश्यक कागदपत्रंची पूर्तता होईपर्यंत नियमांच्या अधीन राहून तात्पुरत्या नियुक्तीचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली.
सहा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांना न्यायासाठी आणखी किती काळ थांबावे लागणार, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.