Kadamba bus 
गोवा

Kadamba Bus | मोर्लेकरांची कदंबसाठी पायपीट! रविवारची बस बंद असल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

Kadamba Bus | प्रवाशांचे हाल; बस नियमित सुरू ठेवण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कदंब महामंडळाची मोर्ले (ता. दोडामार्ग) गावात वस्तीला जाणारी कदंब बस मागचे तीन रविवार बंद आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी गोव्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी आणि बांबोळी येथे वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

त्यामुळे मोर्ले वस्तीची बस दर रविवारीही सुरू ठेवावी, अशी मागणी मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्ये यांनी कदंब महामंडळाकडे केली आहे. कदंब महामंडळाने आंतरराज्य सेवेंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, घोटगेवाडी, उसप आदी गावांमध्ये वस्तीच्या गाड्या सुरू केल्या आहेत.

त्यातील मोर्लेत जाणारी बस गेले तीन रविवार गावात गेलेलीच नाही. बहुतेक जणांना रविवारी सुटी असल्याने प्रवासी भारमानाचा विचार कदाचित महामंडळाने केला असेल. पण, रविवारी बस न गेल्याने सोमवारी गोव्यात येणाऱ्या सर्वांची तारांबळ उडते.

मोर्ले गाव खूप आत, सह्याद्रीच्या कुशीत आहे. तिथून दोडामार्गला यायचे झाल्यास स्वतंत्र वाहन करावे लागते. मात्र, अचानक वाहन मिळणे अशक्य असते. सोमवारी ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. त्यामुळे केवळ जात्या भारमानाचा विचार करून रविवारची फेरी रद्द करू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

मोर्ले बस रविवारी बंद असते याची कल्पना नव्हती. मी लगेच चौकशी करून ती बस नियमित सुरू ठेवण्याबाबत सूचना देतो.
- रोहन कासकर, कदंबचे व्यवस्थापकीय संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT