पणजी : राज्यात एआय कॅमेऱ्यांवर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (आयटीएमएस) ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित झाल्याने दररोज २० हजाराहून अधिक वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची प्रकरणे उघड होत आहेत.
पहिल्याच दिवशी २४ तासांत २३ हजार २५५ जणांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातील १७ वाहनचालकांना चलन दिल्याची माहिती समोर आली आहे तर ४८ तासांत ३५ हजारांहून अधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात बुधवारपासून आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या यंत्रणेद्वारे वाहतूक नियम उल्लंघनाचे चलन थेट मोबाईलवर पाठविले जाणार आहे. आयटीएमएस ही दंडात्मक कारवाई करणारी ऑनलाईन प्रणाली आहे. वाहतूक नियमांचे उच्च तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांतून वाहनांवर बारीक नजर ठेवली जाते आणि वाहतूक नियम उल्लंघनाची तत्काळ नोंद केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्यास डिजिटल चलन पुराव्यासह मोबाईलवर पाठवण्यास सुरुवात झाली आहे
वाहन विम्यासाठी केवळ एक महिन्याची 'डेडलाईन' : वाहतूक मंत्री
पणजी : वाहतूक शिस्त अधिक प्रभावी करण्यासाठी एआय-आधारित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतुक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. तसेच विमा नसलेल्या वाहनधारकांकडे वाहनांचा वैध विमा असणे बंधनकारक असून तो काढण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत दिली आहे.
या कालावधीनंतर विम्याविना वाहन चालविणाऱ्यांवर कोणतीही सवलत न देता कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गुदिन्हो यांनी दिला. अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांनी अतिवेग टाळावा, वाहतूक नियमांचे पालन करावे, नागरिकाने जबाबदारीची भूमिका घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील, असेही गुदिन्हो म्हणाले.