काव्या कोळस्कर
पणजी : अलीकडील इराण - इस्राईल जागतिक युद्धाचा परिणाम देशभरासह गोव्यातही जाणवू लागला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या मर्यादित पुरवठ्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी इलेक्ट्रिक शेगडी घेण्यासाठी गर्दी वाढली असून मेरशीमधल्या शर्मा होम अप्लायन्सेस या दुकानाच्या मालकाने इलेक्ट्रिक दुकानात केवळ २ दिवसात तब्बल ८० इंडक्शन विकल्याचे दुकानदाराने सांगितले. आतापर्यंत अशी विक्री पहिल्यांदाच झाली असून आता अजून इलेक्ट्रिक शेगडीचा साठाच नसल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी सुरू केलेल्या प्रश्नमालिकेनंतर "साधारण महिनाभर पुरेल इतका एलपीजी साठा राज्यात आहे" या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राज्यभरात चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मागील दोन दिवसांत गॅसचा तुटवडा जाणवायला लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेक ठिकाणी सिलिंडरचे दर अचानक वाढल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. याचबरोबर काही भागांत गॅस सिलिंडरचा काळाबाजारही सुरू झाल्याचे समोर आले आहे.
अशा परिस्थितीमुळे घरगुती स्वयंपाकाच्या पर्यायी साधनांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये उत्तर आणि दक्षिण गोव्यात इंडक्शन स्टोव्ह खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. याबाबत मेरशी परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या मालकाने सांगितले की, मागील दोन दिवसांत इंडक्शन स्टोव्हची अभूतपूर्व विक्री झाली आहे. माझ्या आयुष्यात इतकी विक्री मी कधीच पाहिली नाही. फक्त दोन दिवसांत आमच्या दुकानातून तब्बल ८० इंडक्शन स्टोव्ह विकले गेलेत. अजूनही मागणी सुरूच असून आता याचा साठाही संपला असल्याचे त्यांनी सांगितले.
गॅसचा संभाव्य तुटवडा आणि वाढते दर यामुळे नागरिक पर्यायी स्वयंपाकाच्या साधनांकडे वळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक ग्राहकांनी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी इंडक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच काळाबाजार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.