पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय लष्कराचा थलीट बीटेन सिंग याने 'आयकॉनमॅन ७०.३ गोवा २०२६' या प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत खडतर स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने ४ तास २४ मिनिटे २९ सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. या कामगिरीसह त्याने २०२५ मध्ये उज्बेकिस्तानच्या कॉन्स्टॅटिन बेलोसोव्ह याने नोंदवलेला ४ तास २५ मिनिटे ४७ सेकंदाचा विक्रम १ मिनिट १८ सेकंदांनी मोडीत काढला.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह जगातील ३० देशांतील दोन हजारांहून अधिक ट्रायथलिट्सनी सहभाग घेतला. मिरामार बीचवरून सुरू झालेल्या या स्पर्धेत १.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे अशा आव्हानात्मक क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे सेवेत असलेल्या बीटेन सिंगसाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरला. २०२४ मधील स्पर्धेत डिहायड्रेशनमुळे त्याला याव्या लागली होती. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे ध्येय त्याने ठेवले होते. दरम्यान, अनिरुद्ध रविचंद्रन याने ४ तास ४६ मिनिटे ३२ सेकंदांची वेळ नोंदवत द्वितीय, तर निहाल बेग याने ४ तास ५२ मिनिटे ५९ सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला.
रिले स्पर्धेत भारतीय हवाई दलाच्या संघाने तृतीय स्थान मिळवले. देशाच्या विविध भागांत आणि वेगवेगळ्या वातावरणात तैनात असलेल्या जवानांनी एकत्र येत दाखवलेले परिश्रम, सांघिक भावना आणि समन्वय उल्लेखनीय ठरला. गोवा सरकार, 'आयकॉनमॅन' आणि हर्बालिफ़ यांच्या सहकार्याने योस्काच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमुळे क्रीडा पर्यटनाच्या क्षेत्रातील गोव्याची आंतरराष्ट्रीय ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
महिला गटात मरिना शिलियाखतिना हिने ५ तास ३० मिनिटे २९ सेकंदांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. सबिना इसकाकोव्हा (५:४२:५८) हिने द्वितीय, तर मेलानी व्हेन्डट (६:०४:५४) हिने तृतीय क्रमांक मिळवला. रिले गटात टीम फिट स्विंगर्स गोवा (४:३३:२४) संघाने प्रथम, टीम सिरियस अबाऊट ट्रेनिग (४:३५:२२) संघाने द्वितीय, तर टीम एअरफोर्स-२ (४:४७:०४) संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
दरम्यान, धारबांदोडा येथील निवासी आणि सध्या गोव्याच्या एटीएसमध्ये कमांडो म्हणून कार्यरत असलेले दिवेश केरकर यांनी चौथ्यांदा ही स्पर्धा पूर्ण केली. त्यांनी ६ तास २७ मिनिटे २८ सेकंदांची वेळ नोंदवली.