नवी दिल्ली: पीटीआय
कृषी, औषध, यंत्र, रसायनांपासून ते अभियांत्रिकी वस्तूंच्या तीनशेहून अधिक उत्पादनांना रशियन बाजारपेठेत वाढीची संधी आहे. या वस्तूंचे चांगले उत्पादन होत असल्याने भारताला रशियन बाजारपेठेत शिरकाव करण्याची संधी असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. नुकतेच दोन्ही देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारताची रशियाशी असणारी व्यापारी तूट ५९ अब्ज डॉलर आहे. ही तूट कमी करण्यासाठी कोणत्या वस्तूंची निर्यात करता येईल याचा वाणिज्य मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. रशियाच्या एकूण आयातीत भारतीय उत्पादनांचा वाटा अवघा २.३ टक्के आहे. भारत रशियाकडून २०२० साली ५.९४ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करत होता. त्यात २०२४ मध्ये ६४. २४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
भारताची २०२० मध्ये रशियन कच्च्या तेलाची आयात अवघी दोन अब्ज डॉलरची होती. त्यात २०२४ पर्यंत ५७ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. भारताच्या एकूण तेल आयातीत रशियन तेलाचा वाटा २१ टक्के आहे. गत वर्षभरात हा वाटा ३५ ते ३८ टक्क्यांवर गेला आहे. याव्यतिरिक्त भारत खते, खाद्यतेलाची अधिक आयात करतो.
श्रमकेंद्रित क्षेत्रात मोडणाऱ्या कपडे, कापड, चमड्याच्या वस्तू, हातमाग, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ उद्योगातही भारताला वाढीची संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कापड बाजारपेठेत भारताचा हिस्सा एक टक्क्यांहूनही कमी आहे. भारताला मोठा वाव रशिया ३.९ अब्ज डॉलरच्या शेतमालाची आयात करतो.
मात्र भारताची आयात ४५.२ कोटी डॉलरची आहे. रशियाची यंत्र, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, केबल, इंजिन, चासी, स्टील मेटल उत्पादने यांसारख्या इंजिनीअरिंग वस्तूंची आयात २.७ अब्ज डॉलर आहे. भारताची निर्यात अवघी ९ कोटी डॉलर आहे. रशिया चीनवरील अवंबित्व कमी करण्यासाठी इंजिनिअरिंग वस्तूंच्या खरेदीत वैविध्य आणू पाहात आहे. त्यामुळे भारताला निर्यातवाढीस वाव आहे.
रसायने आणि प्लास्टिक क्षेत्रात रशियाची आयात २.०६ अब्ज डॉलर असून भारताची आयात अवघी १३.५ कोटी डॉलर आहे.
औषधाची मात्रा चालेल
भारत हा औषध निर्यातीत आघाडीवर आहे. रशिया दरवर्षी ९.७ अब्ज डॉलरच्या औषधांची आयात करते. भारताचा यातील वाटा अवघा ५४.६ कोटी डॉलर आहे. जेनेरिक औषधांमध्ये भारताचे स्थान वरचे असल्याने औषध निर्यात वाढविण्यास प्रचंड वाव आहे