फोंडा : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सत्तरी, काणकोण, केपे आणि कोडार-फोंडा येथे आयआयटी प्रकल्पाला झालेल्या विरोधानंतर आता फर्मागुढी-बांदोडा परिसरातील नियोजित आयआयटी प्रकल्पालाही विरोध सुरू झाला आहे. रविवारी सकाळी राज्यातील आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी फर्मागुढी येथील कटमगाळ दादा देवस्थानात एकत्र येऊन 'आयआयटी नकोच'च्या घोषणा देत आंदोलन केले.
आंदोलकांनी कटमगाळ दादा परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत देवस्थानात गाऱ्हाणे घातले. यावेळी आरजीचे आमदार विरेश बोरकर, नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक, गुरुदास नाईक, रामा काणकोणकर, दिनेश गावणेकर, शंकर पोळजी, संजय नाईक, मनिषा उसगावकर, डॉ. स्वप्निल कारापूरकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार विरेश बोरकर यांनी सरकारवर टीका करत शैक्षणिक संस्था आणि विविध प्रकल्पांच्या नावाखाली गोव्याची जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. गोमंतकीयांच्या हिताविरोधातील कोणताही प्रकल्प स्वीकारला जाणार नाही. या विषयावर विधानसभेत आवाज उठविणार असून आवश्यक असल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रामा काणकोणकर, शंकर पोळजी, संजय नाईक आणि गुरुदास नाईक यांनी कटमगाळ दादाचा वावर असलेल्या परिसरात आयआयटी प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. गुरुदास नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कारापूर येथील लोढा प्रकल्पाविरोधातील आंदोलकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत फर्मागुढीत हजेरी लावली. विविध भागांतील स्थानिकांनी एकत्र येत नियोजित आयआयटी प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोठा प्रकल्प नकोच...
फर्मागुढी-बांदोडा परिसरातही हा विरोध तीव्र होऊ लागला आहे. आंदोलकांच्या मते, कटमगाळ दादा देवस्थानाचा परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे मोठा प्रकल्प उभारू नये. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याची मागणी सातत्याने पुढे येत आहे.