IFFI GOA 2026 : : इफ्फीमध्ये सात दिग्गजांच्या जन्मशताब्दीचा भव्य सन्मान file photo
गोवा

IFFI GOA 2026 : : इफ्फीमध्ये सात दिग्गजांच्या जन्मशताब्दीचा भव्य सन्मान

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान : एनएफडीसीकडून कलाकृतींचे पुनरुज्जीवन

पुढारी वृत्तसेवा

Iffi grandly honours seven luminaries on their birth centenaries

पणजी : भारत शिंदे १९२६ या एकाच वर्षात जन्मलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सात दिग्गज कलाकारांचा गौरव ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी २०२६) करण्यात येत आहे. उत्तम कुमार, शक्ती सामंत, ओ. पी. नय्यर, सूर्यकांत मांढरे, प्रेम नझीर, राज कुमार आणि बॉम्बे रवी या सात महान व्यक्तिमत्त्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त हिंदी, बंगाली, मल्याळम आणि मराठी या चार भाषांमधील पाच पुनर्स्थापित चित्रपटांचे विशेष मंचन महोत्सवात होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत एनएफडीसीने या कलाकृतींचे पुनरुज्जीवन केले आहे. हा शताब्दी सोहळा भारताचा चित्रपट वारसा जतन करून भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

सन्मानित दिग्गज - त्यांचे निवडक चित्रपट

*उत्तम कुमार : १९४८ मध्ये पदार्पण केलेल्या या बंगाली महान नायकाने २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाला शहरी प्रणयवादाकडे नेले. १९६५ च्या ‘चौरंगी’ चित्रपटात त्यांनी सत्यसुंदर साता बोस यांची भूमिका साकारली होती.

* शक्ती सामंत व ओ. पी. नय्यर : ‘काश्मीर की कली’ या चित्रपटाने या दोघांनाही यशाच्या शिखरावर नेले. शक्ती सामंत यांनी १९५५ मध्ये ‘बहू’द्वारे स्वतंत्र दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि हिंदी व बंगाली मिळून ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर १९५२ मध्ये ‘आसमान’पासून सुरुवात करणाऱ्या ओ. पी. नय्यर यांनी रफी, आशा भोसले व गीता दत्त यांच्यासोबत अनेक अजरामर गाणी दिली.

* सूर्यकांत मांढरे : भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या पद्मश्री सूर्यकांत यांनी शंभराहून अधिक चित्रपटांत विविधरंगी भूमिका केल्या. १९६५ च्या ‘साधी माणसं’ मध्ये त्यांनी साकारलेला शंकर हा लोहार लक्षणीय ठरला; या चित्रपटाला लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन‘ टोपणनावाने संगीत दिले होते.

* प्रेम नझीर : मल्याळममधील या सदाबहार नायकाने ‘तुलाभारम’ मध्ये कामगार नेते राम यांची संयमित भूमिका साकारली. ७०० हून अधिक चित्रपटांतील प्रमुख भूमिका आणि शीला यांच्यासोबत १३० चित्रपटांतील सहअभिनयाचे दोन गिनेस विक्रम त्यांच्या नावावर आहेत; १९८३ मध्ये त्यांना पद्मभूषण मिळाले.

* राज कुमार व बॉम्बे रवी : ‘वक्त’ चित्रपटात राज कुमार यांनी साकारलेला राजा आणि ‘ए मेरी जोहरा जबीं’ हे बॉम्बे रवी यांनी संगीतबद्ध केलेले गाणे आजही लोकप्रिय आहे. १९५२ मध्ये ‘रंगीली’तून आलेल्या राज कुमार यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या, तर ‘वचन’ (१९५५) पासून सुरुवात केलेल्या बॉम्बे रवी यांना परिणयम व सुकृथमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT