पणजी : पणजी येथे दरवर्षी २० ते २८ नोव्हेंबर या काळात आयोजित होणाऱ्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ची तयारी वेगाने सुरू झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. नवी एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत इफ्फीच्या स्टीअरिंग कमिटीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत आगामी चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासोबतच त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महोत्सवात तरुण विद्यार्थी, नवोदित दिग्दर्शक आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांना अधिक संधी देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
बैठकीत डॉ. एल. मुरुगन यांनी तरुण आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट विश्वाशी जोडण्यासाठी इफ्फीने महत्त्वाची भूमिका बजावावी, असे सांगितले. तरुण प्रतिभांना आपली सर्जनशीलता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, अनुभवी दिग्दर्शकांकडून शिकता यावे आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायाशी संवाद साधता यावा, यासाठी विशेष उपक्रम राबवण्यावर त्यांनी भर दिला. याशिवाय मास्टरक्लास, अनुभवी र्मात्यांसोबत संवाद संधी वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश
इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी स्टीअरिंग कमिटीच्या सूचनांचे स्वागत केले. भारत आणि परदेशातील दर्जेदार चित्रपटांची निवड, तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी अधिक संधी तसेच देश-विदेशातील आघाडीच्या दिग्दर्शक आणि सर्जनशील व्यक्तींना सहभागी करून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.