गोवा

IFFI 2026 Indian Panorama | 404 चित्रपटांतून 'धुरंधर'ने मारली बाजी; पाहा कोणते चित्रपट ठरले सर्वोत्कृष्ट?

IFFI 2026 Indian Panorama | 'धुरंधर' उद्घाटननीय कथात्मक, तर 'बिकमिंग'ची उद्घाटननीय कथाबाह्य चित्रपटासाठी निवड

पुढारी वृत्तसेवा

गोवा (पुढारी वृत्तसेवा):

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) प्रमुख विभागांपैकी एक असलेल्या 'इंडियन पॅनेरोमा २०२६' मध्ये यंदा २५ कथात्मक आणि २० कथाबाह्य चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (हिंदी) हा उद्घाटननीय कथात्मक चित्रपट, तर लीना यादव दिग्दर्शित 'बिकमिंग' (लडाखी) हा उद्घाटननीय कथाबाह्य चित्रपट म्हणून निवडण्यात आला आहे.

कथात्मक चित्रपटांमध्ये मुख्य प्रवाहातील चित्रपटांचा समावेश आहे. यंदा इंडियन पॅनेरोमासाठी ४०४ समकालीन भारतीय कथात्मक चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून २७ चित्रपटांची निवड करण्यात आली. तसेच ३५८ कथाबाह्य चित्रपटांच्या प्रवेशिकेमधून २० चित्रपट निवडण्यात आले आहेत.

या चित्रपटांमधून विविध भाषांतील समकालीन भारतीय चित्रपटनिर्मितीचे व्यापक विश्व प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपट कलेचा प्रसार करण्यासाठी सिनेमॅटिक, संकल्पनात्मक आणि सौंदर्यदृष्टीच्या पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कथात्मक व कथाबाह्य चित्रपटांची निवड करणे, हे इंडियन पॅनेरोमाचे उद्दिष्ट आहे. या निवडीसाठी स्वतंत्र परीक्षा मंडळे नेमण्यात आली होती.

भारतीय चित्रपटसृष्टीतील नवे दृष्टिकोण, अभिनय अभिव्यक्ती आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे, तसेच सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्काराचा उद्देश आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भंडारकर यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय परीक्षा मंडळाने कथात्मक चित्रपटांची निवड केली. यामध्ये इंडियन पॅनेरोमा कथात्मक चित्रपट विभागातील मुख्य प्रवाहातील चित्रपटांचाही समावेश आहे.

विविध विभागांतील प्रमुख चित्रपटांची निवड आणि वैशिष्ट्ये

  • कथाबाह्य चित्रपटांची निवड: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ हिमांशू शेखर खटुआ यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय कथाबाह्य चित्रपट परीक्षा मंडळाने ३५८ प्रवेशिकांमधून २० चित्रपटांची निवड केली आहे.

  • पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी पाच चित्रपट: सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी कथात्मक चित्रपटांच्या परीक्षा मंडळाने पाच चित्रपटांची निवड केली आहे, ज्यामध्ये 'चेन्नई लह्स स्टोरी' (तेलगू) - स्त्री वर्मा नाबुरी, 'प्रत्ययर्तन' (बंगाली) - समर्पण सेनगुप्ता, 'निधी' (मराठी) - जिजीविषा काळे, 'स्लेज' (काश्मिरी) - राजा शब्बीर मोहम्मद खान आणि 'हुमान अंश' (हिंदी) - डॉ. विशाल चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

  • मुख्य प्रवाहातील चित्रपट विभाग: 'कांतारा : अ लेजेंड चॅप्टर १' (कन्नड) - रिषभ शेट्टी, 'बाप्पा' (मराठी) - समीर तिवारी, 'मना शंकरा वर प्रसाद गारू' (तेलगू) - अनिल स्पीपुडी, 'धुरंधर' (हिंदी) - आदित्य धर आणि 'देऊळबंद २' (मराठी) - प्रवीण विठ्ठल तरसे या चित्रपटांची निवड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT