Crime pudhari photo
गोवा

Goa Police Slap Lorry Driver Case | फातोर्डात पोलिसाने वाहन चालकाच्या थोबाडीत मारल्याने मानवाधिकार आयोगाकडून दखल

वाहतूक अधीक्षक व उपअधीक्षकांकडे मागितला अहवाल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

फातोर्डा येथील बोर्डा परिसरात ब्रेथलायझर तपासणीदरम्यान एका वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाने लॉरी चालकाच्या थोबाडीत थप्पड मारल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गोवा मानवी हक्क आयोगाने (जीएचआरसी) या घटनेची स्वेच्छा दखल घेतली आहे. आयोगाने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

व्हिडिओ तसेच वृत्तपत्रातील बातमीची दखल घेत न्यायमूर्ती भारत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने पणजी येथील वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक आणि मडगाव येथील वाहतूक कक्षाचे दक्षिण विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांना नोटिसा बजावल्या आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनेबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करावा, तसेच १० जानेवारी २०२७ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोगासमोर वैयक्तिकरित्या किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ब्रेथलायझर तपासणीदरम्यान मारहाण

बोर्डा- फातोर्डा येथे ब्रेथलायझर तपासणी सुरू असताना वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाने लॉरी चालकाला थप्पड मारल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र बळाचा वापर करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

लॉरी असोसिएशनकडूनही निषेध

लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत चारी यांनीही संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या कृतीचा निषेध केला आहे. या प्रकरणी पोलिस विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT