Hospital Sewage  
गोवा

Hospital Sewage | हॉस्पिसिओच्या सांडपाण्याने साळ नदीत प्रदूषण

Hospital Sewage | उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याने फातोर्ड्यात संताप : नागरिकांच्या आरोग्यालाही धोका

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सासष्टी तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी साळ नदी हॉस्पिसिओ जिल्हा रुग्णालयातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप होत आहे. रुग्णालयातील सांडपाणी थेट सखल भागात उघड्यावर वाहत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

दुर्गंधी, असुविधा आणि दूषित पाण्यामुळे फातोर्ड्यात संतापाचे वातावरण आहे. दक्षिण गोव्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयाच्या आवारातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आरोग्य विभाग, मडगाव पालिका आणि राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हॉस्पिसिओ रुग्णालय हे दक्षिण गोव्यातील प्रमुख जिल्हा रुग्णालय असून सासष्टी, केपे, सांगे, काणकोण, कुंकुळ्ळी, मडगाव आणि आसपासच्या भागातील हजारो नागरिक उपचारासाठी येथे येतात.

मात्र, रुग्णालयाच्या सांडपाणी व्यवस्थेतील बिघाडामुळे दूषित पाणी थेट बाहेर पडून रस्त्यावर आणि सखल भागात वाहत असल्याचे चित्र आहे. पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र मिसळल्याने परिसर चिखल, घाण आणि दुर्गंधीने व्यापला आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच रुग्णांना या घाणीमधूनच रुग्णालयात प्रवेश करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून ही समस्या कायम आहे. उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी स्वच्छतेची अशी दुरवस्था होणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

या सांडपाण्याचा प्रवाह पुढे सखल भागातून साळ नदीच्या पात्रात मिसळत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. शेती, मासेमारी आणि परिसराच्या पर्यावरणासाठी महत्त्वाची असलेली साळ नदी दूषित होत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

नदीतील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन भविष्यात त्याचे गंभीर पर्यावरणीय परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिकांनी रुग्णालयातील सांडपाणी व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती, गटारांची साफसफाई, सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा आणि साळ नदीत जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

सरकारवर काँग्रेसची टीका

काँग्रेस नेते योगेश नागवेकर यांनी या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. दक्षिण गोव्याचे जिल्हा रुग्णालय काँग्रेसच्या काळात उभारण्यात आले होते; मात्र या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पाची योग्य निगा राखण्यात विद्यमान सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. उघड्यावर वाहणारे सांडपाणी नागरिकांच्या जिवाशी खेळणारे असून ते रोखण्यासाठी सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे ते म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT