पणजी : पुढारी वृत्तसेवा
हरमल येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात पेडणे न्यायालयाने उत्तराखंडमधील पर्यटक चालक अरविंद रावत याला समन्स बजावले आहेत. या प्रकरणी या संशयित चालकाला २८ जानेवारी २०२६ रोजी पेडणे येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जून २०२५ मध्ये सायंकाळी सुमारे ४ वा. ही अपघाताची घटना घडली होती. मद्यप्राशनाच्या अवस्थेत आणि वैध वाहनचालक परवाना नसताना आरोपीने बेदरकारपणे वाहन चालवले, असा पोलिसांतर्फे सरकारी पक्षाचा आरोप आहे. हरमलच्या पार्किंग परिसरात वाहन घुसवत संशयित चालकाने एका पादचाऱ्याला धडक दिली.
त्यानंतर वाहनाने तीन उभ्या असलेल्या कार, एक स्कूटर आणि अखेरीस वीज खांबाला धडक दिल्यानंतरच वाहन थांबले होते. या अपघातात ७१ वर्षीय पादचारी हनुमंत आत्माराम कदम (रा. मुंबई) गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.