Mining Opposition  
गोवा

Mining Opposition | होंडा ग्रामसभेत सोळयेतील खाण प्रकल्पविरोधात एकमुखाने विरोध; शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायतीला निवेदन

Mining Opposition | शेतकऱ्यांकडून निवेदन : 'ना हरकत' दिले नसल्याचे सरपंचांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

होंडा : पुढारी वृत्तसेवा
सोळये येथे सुरू होणाऱ्या मेसर्स अग्रवंशी खाण कंपनीला होंडा पंचायतीच्या ग्रामसभेत विरोध करण्यात आला. या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कंपनीला कोणत्याही प्रकारचा 'ना हरकत' दाखला देऊ नये. तसेच कंपनीच्या कामकाजामुळे गाव नष्ट होणार असल्याची व्यक्त करून कंपनीने बेकायदा रस्त्यावर अतिक्रमण केल्याने त्या कंपनीवर पंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पंचायत सभागृहात रविवारी सरपंच शिवदास माडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा करताना सोळये होंडा येथील सुमारे ५६ ग्रामस्थांनी गावात सुरू होत असलेल्या मेसर्स अग्रवंशी खाण कंपनी संदर्भात दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यात आली.

कंपनीने गावात जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. खांब उभे केले आहेत. खाण बंद आहे, तेव्हापासून गावातील नैसर्गिक वातावरण चांगले आहे. त्यामुळे होंडा पंचायतीच्या वतीने संबंधित खाणीला कोणत्याही प्रकारचा ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली आहे.

यावेळी सरपंच शिवदास माडकर यांनी सांगितले की, अजूनपर्यंत त्या कंपनीला कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नाही. त्याचप्रमाणे पंचायतीच्या अधिकारात येणाऱ्या गोष्टींवर पंचायत निश्चित कारवाई करणार आहे.

परंतु अधिकार क्षेत्राबाहेरील गोष्टींसाठी ग्रामस्थांनी मामलेदार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात, असे स्पष्ट केले. ग्रामसभेत होंडा नारायण नगर पठारावर टाकण्यात आलेल्या औद्योगिक कचरा अजून उचलला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई वाढेल, असे सांगितले. यावेळी सरपंच शिवदास माडकर यांनी सांगितले की, अद्याप गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने या भागात येऊन सर्वेक्षण केलेले नाही.

त्याचप्रमाणे पोलिसांनी आपला अहवाल सादर केलेला नसल्याने कारवाई करण्यासाठी वेळ होत आहे. पंचायतीच्या वतीने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून संयुक्त सर्वेक्षणाची मागणी केली आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सचिव मुल्ला वरक यांनी सांगितले.
पंचायत सचिव मुल्ला वरक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. उपसरपंच सिया बोडके, नीलिमा शेट्ये, कृष्णा गावकर, प्रमोद गावडे, रेशम गावकर, सुमेधा माडकर, तसेच गटविकास कार्यालयातर्फे जानवी परब या उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT