

वाळपई ः दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर वध कार्यक्रमावेळी होंडा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रूपेश पोके यांनी एकूण आठ जणांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास प्रक्रिया गतिमान केली आहे. मंगळवारी दिवसभर होंडा परिसरात संशयितांचा शोध घेण्यासह विविध ठिकाणी पोलिस चौकशी करण्यात आली. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अलोक कुमार व डिचोली पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी व इतर अधिकार्यांनी होंडा पोलिस ठाण्यावर प्रत्यक्ष भेट देऊन या प्रकरणाचा संपूर्णपणे आढावा घेतला.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यासमोरील कारचे नुकसान, पोलिस ठाण्यावर दगडफेक करणार्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पंचायतीमधून अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक यांनी प्रत्यक्षपणे पंचायत कार्यालयात जाऊन सदर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान प्राप्त माहितीनुसार पंचायतीमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न आज करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अनेकांची धरपकड सुरू केलेली आहे. प्राप्त माहितीनुसार 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतलेली आहे. या प्रकरणांत गुंतलेल्या सर्वांना गजाआड करावे, अशी मागणी मंत्र्यांनी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार होंडा पंचायतीला पोलीस संरक्षण देण्यात आलेली आहे .कारण ज्या ठिकाणी सदर घटना घडली होती त्याचे दस्तऐवज सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेले आहेत. यामुळे सदर सी .सी.टीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न नाकारता यण्यासारखे नाही. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यामुळे इमारतीला पोलीस संरक्षण देण्यात आलेली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होंडा येथील पोलिस ठाण्याचा सीसीटीव्ही वर्षापूर्वीच बिघडलेला आहे. त्यामुळे पोलिस खात्याचा गैरकारभार उघडकीस आला आहे. वर्षभरापूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त झालेली असताना त्या ठिकाणी ती दुरुस्ती करणे किंवा त्याच्या जागी नवीन सीसीटीव्ही बसविण्यात न आल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.