मतदानाच्या स्लिपवर सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल असे नमूद केल्याने मतदार लवकर केंद्रावर पोहोचले.
प्रत्यक्षात मतदानाची वेळ सकाळी ८ वाजता असल्याने मतदारांना परत पाठवण्यात आले.
या हलगर्जीपणामुळे हरमल पार्सेकरवाडा मतदान केंद्रावर गोंधळ उडाला.
मतदान व्यवस्थेतील त्रुटींवर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हरमल : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकीस काही स्लिपवर मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्या ५ पर्यंत नमूद केल्याने कित्येक मतदार सकाळी ७ वा. केंद्रावर आले, मात्र हलगर्जीपणामुळे मतदारांना मनस्ताप सोसावा लागला. त्यांना पुन्हा पाठवण्यात आल्याने एकच गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
हरमल पार्सेकरवाडा मतदान केंद्रावर कित्येक मतदार सकाळी ७.१५ वा. मतदान करण्यासाठी पोचले असता, त्यांना मतदान सुरू होण्याची वेळ सकाळी ८ वा. असल्याचे सांगितले. त्यामुळे मतदारांना निराश व्हावे लागले. मात्र, मतदान प्रक्रियेत इतका घोळ कोणाकडून नेमका झाला याबद्दल चर्चा सुरू होती.
या हलगर्जीपणामुळे मतदानाचा हक्क असलेल्या मतदारांची, सरकारला किंवा निवडणूक आयोगाला फिकीर नसल्याचे दिसून येते, असा शिमगा होणे म्हणजे स्वैर कारभार असल्याची संतप्त प्रतिक्रिया जागृत मतदाराने व्यक्त केली.