मच्छीमार पेलेसोबत हरमनप्रीत कौर. pudhari photo
गोवा

Harmanpreet Kaur : स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा आवडतो

क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर : मच्छीमार पेले यांच्यासोबत मनमोकळा संवाद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्यातील स्वच्छ, निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे मला नेहमीच गोव्यात यायला आवडते. त्यामुळे सुट्टीसाठी किंवा विश्रांतीसाठी माझी पसंती बहुतेक वेळा गोव्यालाच असते, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी व्यक्त केले.

सध्या हरमनप्रीत कौर या दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रकिनारी विश्रांतीसाठी आल्या असून, तेथील स्थानिक प्रसिद्ध मच्छीमार पेले यांच्यासोबत त्यांनी मनमोकळा संवाद साधला. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत त्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या जीवनशैलीविषयीही जाणून घेतले. गोव्यातील किनारे, हिरवाईने नटलेले परिसर आणि शांत वातावरण पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसोबत अनेक सेलिब्रिटीही गोव्याच्या मोहात पडताना दिसतात.

गोवा हा केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर विश्रांती आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठीही उत्तम ठिकाण असल्याचे हरमनप्रीत यांनी सांगितले. महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरातून संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी भारतीय पुरुष क्रिकेट संघानेही विश्वचषक जिंकून देशाचा अभिमान वाढविला आहे.

या दोन्ही यशामुळे भारतीय क्रिकेटची ताकद जगासमोर पुन्हा अधोरेखित झाली असल्याचे हरमनप्रीत कौर यांनी नमूद केले. महिला क्रिकेटही आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत असून तरुण मुलींमध्ये क्रिकेटविषयीची आवड वाढत आहे. भविष्यात महिला क्रिकेटला आणखी मोठे व्यासपीठ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बोट राईडिंगचीही इच्छा

दरम्यान, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर स्थानिक मच्छीमार ज्या पद्धतीने मासेमारी करतात, ते पाहणे अत्यंत रंजक वाटते. संधी मिळाल्यास गोव्यात स्वतः ही मासेमारी करण्याचा अनुभव घ्यायला आवडेल. तसेच समुद्रात बोट राईडिंग करण्याचीही इच्छा असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कौर यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT