हरमल : पुढारी वृत्तसेवा
पंचायत क्षेत्रातील काही स्पा व मसाज पार्लरमध्ये अनैतिक प्रकार घडत असल्याच्या तक्रारींमुळे गावातील महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असून पर्यटन स्थळाची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. यानंतर अशा व्यवसायांना पूर्णतः बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव हरमल ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुशांत गावडे होते. प्रारंभी सचिव रजत नार्वेकर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला; मात्र त्यास मंजुरी देण्यास ग्रामस्थांनी हरकत घेत ग्रामसभा रोखून धरली. पंचायत क्षेत्रातील स्पा-मसाज पार्लर पूर्णपणे बंद करण्यासाठी पंच सदस्य ग्रामस्थांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कुठेही असा व्यवसाय सुरू आढळल्यास पंचायत, ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचा ठराव पीटर कार्डोज व जॉकी रॉड्रिग्ज यांनी मांडला. ग्रामसभेच्या सुरुवातीला गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. आचारसंहितेनंतर तीन महिन्यांनी ग्रामसभा का घेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होताच सभेत तीव्र चर्चा रंगली. काही ठराव ग्रामस्थांना विश्वासात न घेता मंजूर झाल्याचा आरोप करत नागरिकांनी आक्षेप घेतला.
भाडेपट्टी करारांवरील शुल्क आकारणीच्या ठरावावरही वाद निर्माण झाला. ग्रामसभेने मंजुरी न दिलेल्या ठरावाला सरपंच व उपसरपंचांनी सूचक व अनुमोदन कसे दिले, अशी विचारणा ग्रामस्थांनी केली. नंतर नव्या ठरावानुसार संबंधित शुल्क न आकारण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
भटवाडी-कोरगाव मुख्य रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, स्मशानभूमीची नोंदणी करावी तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाची पाटी लावावी, अशा मागण्या माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केल्या. गावातील आस्थापनांची नोंदणी, शुल्क वसुली, पार्किंगमधील कचरा व्यवस्थापन तसेच पंचायत निधी वाढीसाठी कर आकारणी यावरही चर्चा झाली.
भटवाडी भागातील जमीन रूपांतरणाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत गावाच्या संरक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या ग्रामसभेला उपसरपंच सोनाली माज्जी यांच्यासह पंच सदस्य, गटविकास खात्याचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सभेदरम्यान ग्रामस्थ व पंच सदस्यांमध्ये तीव्र चर्चा झाली. काही सदस्यांना बोलण्यासही मज्जाव करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. ग्रामसभेतील प्रत्येक निर्णय ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्या...
व्यावसायिकांना कायमस्वरूपी परवाने न देता तात्पुरते दाखले देण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त झाली. आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे फायली अडवू नयेत व या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.