पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे दुर्घटनेप्रकरणी सादर केलेली जनहित याचिका आज सुनावणीस आली असता, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ती स्वेच्छा (सुमोटो) याचिकेसोबत जोडून या दोन्ही याचिकांवरील एकत्रित सुनावणी १२ जानेवारी २०२६ ला ठेवली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. सरकारने स्थापन केलेल्या दंडाधिकारी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. हणजूण पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या दुर्घटनेची स्वेच्छा दखल घेताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगलेच फटकारले आहे. त्यांच्याकडून कारवाईस होणाऱ्या दिरंगाईमुळे अशा बेकायदा कारवायांना संधी मिळत असल्याचे निरीक्षण केले होते.
हडफडेतील नाईट क्लब जळीतकांडानंतर नेमण्यात आलेल्या अंमलबजावणी समितीने राज्यातील क्लबची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. या समितीने मंगळवारी सुरक्षा कायद्याची कोणतीही उपाययोजना न करता व कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वागातोर समुद्रकिनाऱ्यावरील 'सॅल्यूड' व 'क्लारा' हे दोन नाईट बीच क्लब आणि हणजूण किनाऱ्यावरील 'मयंक' बीच क्लब सील केले. या समितीने यापूर्वी 'गोया', 'दियाज', 'कॅफे सिओ टू' व 'द केप गोवा' हे चार नाईट क्लब सील केले आहेत. त्यामुळे सील केलेल्या क्लबची संख्या सातवर पोहोचली आहे.