पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे नाईट क्लब अग्नीकांड प्रकरणी दंडाधिकारी चौकशी अहवालात राज्य सरकारला ६० शिफारशी करण्यात आल्या आहेत. यात आगीच्या घटना रोखण्यासाठी तातडीने कृती करावी, यावर भर देतानाच अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
हडफडे येथील वर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने नुकताच अहवाल सरकारला सादर केला आहे.
यात बेकारदा चालविले जाणारे क्लब शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारसही यात करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल १०८ पानांचा आहे, त्याशिवाय ५०० अधिक पानांचे परिशिष्ट आणि विधाने आहेत. शिफारशींमध्ये, चौकशी अहवालात प्रत्येक विभागाविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता असलेल्या त्रुटी आणि कृतींचा तपशीलवार उल्लेख आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
म्हापसा न्यायालयात अटकेत असलेले बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा याच्या जामीनावरील अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यांच्यावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या एनओसीची बनावटगिरी करून अबकारी (एक्साईस) परवाना मिळवल्याचा आरोप आहे. त्यांचा जोडीदार अजय गुप्ता यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
... पुढील आढवड्यात घेणार आढावा :
मुख्यमंत्री, मुख्य सचिव, डीजीपी पुढील आठवड्यात चौकशा समितीने दिलेल्या अहवालाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर आवश्यक कारवाई सुरू केली जाईल. गरज पडल्यास काहींच्या निलंबनाचाही समावेश असू शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्यांवर ठपका...
समितीने अनेक कागदपत्रांची छाननी आणि जबाब नोंदवत पंधरा दिवसांत अहवाल सादर केला आहे. यात प्रशासनातील विविध अधिकारी व खाते प्रमुखांनी वेळेवर तपासणी न केल्याने व गरजेच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे नमूद केले आहे.
दंडाधिकारी चौकशीचे नेतृत्व जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी केले. या समितीमध्ये दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी टिकम सिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक आशुतोष आपटे आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांचा समावेश आहे.