Goa Romeo Lane Demolition 
गोवा

Goa Night Club Fire : लुथरा बंधू थायलंडमध्ये अखेर जेरबंद

Goa Night Club Fire : लवकरच आणणार गोव्यात : दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये गेल्या शनिवारी रात्री (६ डिसेंबर) लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पलायन केलेल्या क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा या बंधूंना गुरुवारी सकाळी थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असून सीबीआयचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी थायलंडला जाणार आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही दिल्लीतील रोहिनी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची अटक अटळ असून त्यांना लवकरच गोव्यात आणले जाणार आहे.

सीबीआय पथक दिल्लीहून थायलंडला रवाना झाले असून ते सर्व सोपस्कार पूर्ण करून उद्यापर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिल्लीतील न्यायालयाकडून लुथरा बंधूंना ट्रान्झीट परवाना घेऊन गोव्यात आणले जाणार आहे. गोवा पोलिस पथक गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहे.

लुथरा बंधूंविरुद्धच्या गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यांच्या चुकीमुळे २५ जणांचा मृत्यू झाला. असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित अजय गुप्ता हा नाईट क्लबच्या लुथरा बंधूंच्या व्यवसायात भागीदार आहे. त्याला बुधवारी संध्याकाळी दिल्लीतून गोव्यात आणून गुरुवारी न्यायालयात उभे केले असता, म्हापसा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिसांनी त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती केली होती.

याप्रकरणात सुरुवातीला ४ व्यवस्थापकांना अटक केली होती. त्यांची ५ दिवसांची पोलिस कोठडी शुक्रवारी (१२ डिसेंबरला) संपणार आहे. नाईट क्लबमध्ये भीषण आगीची दुर्घटना घडल्याचे कळताच दोन तासांच्या आत लुथरा बंधूंनी फुकेटला (थायलंड) जाण्यासाठी विमानाची तिकीटे बुक केली. गोवा पोलिस या दुर्घटनेसंदर्भात माहिती घेत असतानाच रविवारी (७ डिसेंबर) पहाटे ५.३० च्या सुमारास दिल्ली विमानतळावरून फुकेटला त्यांनी पलायन केले.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ तसेच ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात आल्या होत्या. केंद्रीय सीबीआय यंत्रणेने थायलंडच्या इंटरपोल पोलिसांशी संपर्क ठेवत या दुर्घटनेची माहिती दिली व लुथरा बंधूंचा शोध घेऊन ताब्यात घेण्याची विनंती केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातून पलायन केलेले लुथरा बंधू हे फुकेटच्या काथू जिल्ह्यात शहरापासून दूरवर एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. ही माहिती थायलंड इंटरपोल पोलिसांनी मिळवल्यावर गुरुवारी सकाळी त्या दोघांना या हॉटेलवरून ताब्यात घेण्यात आले.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्या दोघांचे पासपोर्ट जप्त करण्याचे निर्देश दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी स्थानबद्ध (डिटेंशन) केंद्रात करण्यात आली. त्यानंतर त्यांना फुकेट विमानतळावर आणून भारतात पाठवण्याची ट्रान्झिट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारताच्या अंमलबजावणी यंत्रणेकडे सोपवण्यात येणार आहे.

लुथरा बंधूंची भारतात पाठवणी (डिपोर्टेशन) करण्याची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असून, ते शनिवारी सकाळपर्यंत भारतात आणले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने लुथरा बंधूंचे पासपोर्ट जप्त केले असून, ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्णतः थांबणार आहे.

गोवा पोलिस, सीबीआय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) आणि थायलंडमधील अधिकारी सातत्याने संपर्कात असून, लुथरा बंधूंना भारतात आणून पुढील तपास आणि न्यायप्रक्रिया जलदगतीने पुढे नेण्याचे प्रयत्न गोवा पोलिसांनी सुरू केले आहेत.

अजय गुप्ताला ७ दिवस कोठडी

हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या संशयित अजय गुप्ता याची चौकशी केली असता, त्याने या दुर्घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे आणि कोणतीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. लुथरा बंधू चालवत असलेल्या या नाईट क्लबच्या व्यवसायात पैशांची गुंतवणूक करून फक्त भागीदार असल्याचे त्याने सांगितले.

या नाईट क्लबला आवश्यक असलेल्या परवान्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

निलंबित रघुवीर बागकरला अंतरिम अटकपूर्व जामीन

बाय रोमिओ लेन नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या हडफडे–नागोवा येथील तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. म्हापसा न्यायालयाने त्यांना आज अंतरिम अटकपूर्व जामीन देत त्यावरील सुनावणी शुक्रवारी, १२ रोजी ठेवली आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करायची असल्यास, या सुनावणीनंतरच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे.

हडफडे सरपंच रोशन रेडकर यांची न्यायालयात धाव

बर्च क्लब दुर्घटनेनंतर हणजूण पोलिसांनी हडफडे–नागोवा सरपंच रोशन रेडकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. स्थानिकांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना परत पाठवले.

मात्र पोलिसांची चौकशी सखोल सुरू झाल्याने अटकेच्या भीतीने त्यांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाकडून त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात आला असून सुनावणी शुक्रवारी (१२ रोजी) ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT