

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
वास्कोतील दरोड्याच्या घटनेला महिनाही उलटला नसेल तोच बुधवारी मडगावातील गजबजलेल्या पाजीफोंड भागात एका वृद्ध दाम्पत्याचे घर लुटण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
ओर्नाल्डो काब्राल असे घरमालकाचे नाव असून ते व त्यांची पत्नी दोघेही वृद्धाश्रमात राहत आहेत. घरातील ९ लाखांचे दागिने व ५० हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्यातील एका कपाटात असलेली दारू व खाद्य पदार्थ्यांवरही ताव मारल्याचे निदर्शनास आले. सविस्तर माहितीनुसार दोघेही वृद्ध पती-पत्नी वृद्धाश्रमात राहत आहेत. गुरुवारी सकाळी दोघे घरी आले असता त्यांना घरातील सर्व सामान अस्तव्यस्त आढळून आले.
स्वयंपाक घराच्या खिडकीचे ग्रील्स घराच्या हॉलमध्ये पडले होते. त्यावरून चोरांनी स्वयंपाक घराच्या खिडकीचा वापर करून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही चोरी नेमकी कधी झाली हे आपण सांगू शकत नाही आपण गेल्या शनिवारी सर्वात शेवटी घरी आलो होतो, असा जवाब काब्राल यांनी पोलिसांना दिला आहे. घरात प्रवेश करत चोरांनी घरातील कपाट फोडल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचा प्रकार या सात दिवसांच्या कालावधीत घडला असावा.
चोरांनी ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची माहिती काब्राल यांनी पोलिसांना दिली आहे. दागिन्यांमध्ये हिऱ्यांची माळ, सोन्याचा नेकलेस सोन्याच्या बांगड्या, झुंबर यांचा समावेश आहे. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून चोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.