Traditional Blacksmith Goa 
गोवा

Traditional Blacksmith Goa | ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे...

Traditional Blacksmith Goa | कुंकळ्ळीच्या कोंबा परीकट्टोत कष्टाच्या हाताने घुमतोय 'घणाणाती आवाज

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

ज्याचे हात कष्टाला सरावलेले असतात, त्याच हातांनी इतिहास घडतो, असे म्हटले जाते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक यंत्रसामग्री आणि कारखानदारीच्या युगात हाताने घडणाऱ्या कलेचे महत्त्व झपाट्याने कमी होत आहे. एकेकाळी प्रत्येक गावाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली लोहारकला आता नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. मात्र, दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळीच्या कोंबा परीकट्टोगातील एका साध्यासुध्या भट्टीत अजूनही हातोड्याचे घणाघाती आवाज ऐकू येतात.

कोळशाच्या भट्टीत लालभडक झालेले लोखंड आकार घेत असते आणि त्यातून निर्माण होणारे प्रत्येक अवजार गोव्याच्या ग्रामीण संस्कृतीचा इतिहास सांगत असते. या इतिहासाचे अखेरचे शिलेदार म्हणजे गिल्हेमें डायस. गिल्हेमें डायस यांचे 'कामारची साळ' म्हणून ओळखले जाणारे छोटेसे लोहारकामाचे ठिकाण आज जणू एखाद्या जिवंत संग्रहालयाप्रमाणे वाटते.

कार्यशाळेत प्रवेश करताच आधुनिक युगापासून अनेक दशके मागे गेल्याची अनुभूती येते. एका बाजूला धगधगणारी कोळशाची भट्टी, दुसऱ्या बाजूला पारंपरिक भाते, ऐरणीवर ठेवलेले तापलेले लोखंड आणि त्यावर अचूक लयीत बसणारे हातोड्याचे घाव, हे दृश्य केवळ कामाचे नसून, गोव्याच्या पारंपरिक कारागिरीचे दर्शन घडवणारे आहे. पूर्वजांकडून मिळालेला हा वारसा गिल्हेर्ने डायस आजही अत्यंत निष्ठेने जपत आहेत.

भंगारातील लोखंड आणि पोलाद गोळा करून त्याला नवजीवन देण्याचे काम ते करतात. प्रथम लोखंड कोळशाच्या भट्टीत लालभडक होईपर्यंत तापवले जाते. पारंपरिक भात्याच्या सहाय्याने आगीची तीव्रता वाढवली जाते. त्यानंतर तापलेले लोखंड ऐरणीवर ठेवून हातोड्याच्या अचूक घावांनी त्याला आवश्यक तो आकार दिला जातो. आकार देण्याची ही प्रक्रिया इतकी बारकाईची असते की, एका चुकीच्या घावामुळे संपूर्ण अवजार पुन्हा नव्याने तयार करावे लागू शकते.

लोखंडाला आकार दिल्यानंतर त्याला पुन्हा तापवून धार लावली जाते. त्यानंतर विशिष्ट पद्धतीने थंड करून धातू अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवला जातो. या सर्व प्रक्रियेनंतर तयार होणारे कोयते, कुदळी, कुन्हाडी, फावडी, टिकाव, सुऱ्या आणि इतर शेतीसाठी लागणारी अवजारे ही केवळ साधने नसून, कारागिराच्या अनेक दशकांच्या अनुभवाची साक्ष देणारी कलाकृती असतात.

विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने कोयता तयार करण्याचे कौशल्य आज गोव्यात जवळपास लुप्त झाले आहे. गिल्हेर्मे डायस अजूनही ही दुर्मीळ कला जपणाऱ्या मोजक्या कारागिरांपैकी एक आहेत. त्यांच्या हातून तयार होणारा प्रत्येक कोयता हा शेतकऱ्याच्या श्रमाचा साथीदार असतो, पण त्याचबरोबर तो गोव्याच्या लोकपरंपरेचा अमूल्य ठेवाही असतो.

आज गिल्हेमें डायस यांच्यासारखे कारागीर केवळ व्यवसाय करत नाहीत, तर एका संपूर्ण सांस्कृतिक वारशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्या हातातील कौशल्याला पर्याय नाही. यंत्रे हजारो अवजारे तयार करू शकतात, पण प्रत्येक अवजारात आत्मा फुंकण्याची ताकद फक्त कुशल कारागिराच्या हातातच असते.

काळ बदलला आणि...

एकेकाळी गोव्यातील प्रत्येक गावात लोहाराचे स्थान महत्त्वाचे होते. शेतीची अवजारे तयार करणे, त्यांना धार लावणे, नारळ व माडांवर चढणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक साधने बनविणे, घरगुती वापरातील लोखंडी वस्तू तयार करणे, बैलगाड्यांच्या भागांची दुरुस्ती करणे अशा असंख्य कामांसाठी गावकऱ्यांचा लोहारावर पूर्ण विश्वास होता. गावातील अर्थव्यवस्थेचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ होता.

मात्र, काळ बदलला. कारखान्यांमध्ये तयार होणारी स्वस्त अवजारे बाजारात उपलब्ध झाली. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे हस्तकलेची गरज कमी झाली. लोकांच्या वापराच्या सवयी बदलल्या आणि त्याचा थेट परिणाम पारंपरिक लोहार व्यवसायावर झाला. मेहनत प्रचंड आणि उत्पन्न अत्यल्प असल्याने पुढील पिढीने हा व्यवसाय स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी गोव्यातील अनेक 'कामारची साळ' कायमच्या बंद झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT