पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील गृहिणींसाठी राबवण्यात येणारी 'गृह आधार योजना' व ज्येष्ठ, दिव्यांग व विधवांसाठी राबवण्यात येणारी 'दयानंद सामाजिक सुरक्षा योजना' (डीडीएसवाय) या दोन योजनांचे मानधन वाढवले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पर्वरी येथे दिली.
याबाबत डॉ. सावंत म्हणाले की, गृह आधार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू होऊन वर्षे झालेली आहेत.
भाजपच्या सरकारनेच त्या सुरू केल्या होत्या, आपण या योजनांचे मानधन वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गृह आधार व डीडीएसवाय योजनांचे मानधन निश्चितपणे वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पणजी येथे पुरातत्त्व खात्याला नवी इमारत बांधण्यासाठी ४,४०१ चौ. मी. जागा देण्याचा निर्णय बुधवारी पर्वरी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. सावंत म्हणाले की, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय घेण्यात आले.
राज्याच्या पुरातत्त्व खात्याला ४,४०१ चौरस मीटर जमीन हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'वर्ल्ड ओशन सायन्स काँग्रेस' या परिषदेला राज्य सरकारतर्फे अधिकृत स्पॉन्सरशिप देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. असे सांगून प्रशासकीय गतिमानता वाढवण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक मजबूत केली जाणार आहे.
नागरिकांना सेवा हक्क कायद्यांतर्गत सर्व सेवा निर्धारित वेळेत मिळणे बंधनकारक करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी रस्ते रुंदीकरण, पूल उभारणी व दुरुस्तीच्या कामांना भरीव निधी मंजूर झाला आहे. उत्तर व दक्षिण गोव्यातील पर्यटन मार्गाच्या सुधारणेवर भर दिला जाईल.
याशिवाय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे, सामाजिक कल्याण योजनांचे मानधन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे व डिजिटल पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी देण्याचे ठरले आहे. नागरी स्वच्छतेसाठी स्थानिक पंचायती व नगरपालिकांना कचरा संकलनासाठी अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
गोवा उज्ज्वला योजनेसाठी नवे फॉर्म आले आहेत. त्यावर मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे छायाचित्र आहे. मात्र, ज्यांनी जुने फॉर्म भरून दिले आहेत, तेही चालणार आहेत. ज्यांचे अर्ज छाननी झालेत त्यांच्या खात्यात गुरुवार, दि. १० रोजी तीन सिलिंडर्ससाठी तीन हजार रुपये निधी जमा होणार आहे. लवकर निधी खात्यात वळवता यावा यासाठी आणि दयानंद सामाजिक सुरक्षा व गृह आधार योजनांचे पैसे जमा होणाऱ्या महिलांचे बँक डिटेल मागितले होते, अशी माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.