Marigold farming: झेंडू फुलांनी वाड्यातील गातेस खुर्द गावाला बनविले समृद्ध  Pudhari
गोवा

Marigold Flower Farming | झेंडू फुलांच्या शेतीतून गोळावलीतील महिला बचत गटाची स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल

Marigold Flower Farming | पहिल्यांदाच दसऱ्याला या महिलांनी ४० किलो झेंडू विकले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

  • गोळावली सत्तरी येथील कुलदेवी सिद्धेश्वर महिला बचत गटाची मेहनत; आतापर्यंत सुमारे ४० किलो फुलांची विक्री

  • वनराई प्रकल्प, नाबार्डच्या सहकार्याने नवी दिशा

  • दिवाळीनिमित्त विक्रीसाठी बचत गट सज्ज

सत्तरी : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यातील गोळावली येथील सत्तरी कुलदेवी सिद्धेश्वर महिला बचत गटाने स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू केली असून वनराई प्रकल्प व नाबार्डच्या सहकार्याने येथील महिलांना झेंडू फुलांच्या शेतीच्या व्यवसायाची नवी दिशा मिळाली आहे. पहिल्यांदाच दसऱ्याला या महिलांनी ४० किलो झेंडू विकले आहेत.

दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले तयार झालेली आहेत, अशी माहिती या बचत गटाच्या प्रमुख ऊर्मिला लक्ष्मण खोत, प्रीती पांडुरंग खोत आणि रक्षांदा रामा खोत या महिलांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महिला बचत गट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

महिलांच्या कौशल्याला योग्य दिशा, व्यवसायासाठी प्रोत्साहन आणि बाजारपेठेची संधी मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. याचे उदाहरण म्हणून सत्तरी तालुक्यातील ठाणे पंचायत क्षेत्रातील गोळावली गावातील 'सत्तरी कुलदेवी सिद्धेश्वर' महिला स्वयं-सहायता बचत गटाच्या उपक्रमाकडे पाहता येईल. या बचत गटाने आतापर्यंत सुमारे ४० किलो उत्पादनाची विक्री केली आहे.

ऊर्मिला लक्ष्मण खोत, प्रीती पांडुरंग खोत आणि रक्षांदा रामा खोत या महिलांनी एकत्र येऊन ही झेंडूच्या फुलांची शेती केली. स्थानिक पातळीवर उत्पादनाची निर्मिती आणि त्याची विक्री यांमधून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी ग्रामीण महिलांना मिळत आहे. या उपक्रमाला वनराई संस्थेच्या नाबार्ड-संबंधित जलसंधारण विकास निधीअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाशी संबंधित कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

गावातील या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उपजीविकेच्या संधी वाढवणे आणि स्थानिक समुदायाला सक्षम करण्याच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प समन्वयक विठ्ठल शेटकर, वरिष्ठ क्षेत्रीय कार्यकारी प्रितेश गावकर आणि क्षेत्रीय कार्यकारी सुशांत धाडी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बचत गटाच्या उपक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे.

तसेच महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मदत होत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून केवळ आर्थिक व्यवहार होत नाहीत, तर महिलांमध्ये एकत्रित काम करण्याची वृत्ती, नियोजनाचे कौशल्य आणि आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यासही मदत होते.

उत्पादनाची विक्री करणे, ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करणे या बाबी ग्रामीण महिलांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. उत्पादनाची मागणी वाढवणे, विक्रीसाठी नवीन बाजारपेठ शोधणे आणि उत्पादनाचा दर्जा कायम राखणे यांवर भर दिल्यास या उपक्रमाला भविष्यात अधिक चांगली संधी मिळू शकते.

ग्रामीण भागात आर्थिक विकासाच्या नव्या संधी

'सत्तरी कुलदेवी सिद्धेश्वर' महिला बचत गटाचा हा प्रयत्न ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठेची साथ मिळाल्यास अशा उपक्रमांतून ग्रामीण भागात आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

गोव्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

गोव्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. दसरा, नवरात्रौत्सव दसरा व दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणात ही फुले खरेदी करतात. परराज्यातील व्यापारी या फुलांच्या विक्रीतून लाखो रुपये कमवतात. गोव्यातील जमिनीत झेंडूची फुले चांगली होतात हे गोळावलीच्या महिलांनी दाखवून दिले असून राज्यातील इतर महिलांनी त्यांच्या या उपक्रमापासून प्रेरणा घेतल्यास त्यांचीही आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते, अशी प्रतिक्रिया नाबार्डच्या अधिकाऱ्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT