Goa : राज्यातील टॅक्सी सेवा अ‍ॅपवरच हवी Pudhari File Photo
गोवा

Goa Motorcycle Taxi Pilot Crisis | गोव्याच्या लाईफलाईनचा अस्तित्वासाठी संघर्ष

Goa Motorcycle Taxi Pilot Crisis | अनेक कारणांमुळे विश्वासार्ह मोटारसायकल टॅक्सी सेवा अडचणीत; पायलट अहोरात्र ग्रामीण, शहरी भागात देताहेत सेवा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

रैंट अ बाईकने व्यवसायावर केलेले अतिक्रमण, सरकारी कार्यालयातील बाबूंची नकारात्मकता, सोबतच सरकारची उदासीनता यामुळे गोव्याची लाइफलाईन असलेली मोटारसायकल टॅक्सी सेवा सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. मोटारसायकल टॅक्सी सेवा दिवसरात्र आणि शहरी व ग्रामीण भागात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासार्ह सेवा मानली जायची आणि आजही मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत मोटारसायकल टॅक्सी चालवणारे पायलट विविध समस्यांचा सामना करीत आहेत.

एक काळ असा होता की, मोटारसायकल टॅक्सी सेवा संपूर्ण राज्यभरात होती. सगळ्यांचे विश्वासाचे दळणवळणाचे साधन म्हणजे ही टॅक्सी सेवा होती. जवळपास ६,५०० ते ७,००० पायलट राज्यात सेवा देत होते. मात्र, अनेकविध कारणांमुळे आता विशेष ही संख्या २,००० च्या आत आली आहे. जसजसे पर्यटक वाढू लागले तशी वाहतूक साधनांची गरज भासू लागली.

एका बाजूला मोटारसायकल टॅक्सी तर त्याला समांतर ठरणारी रेंट अ केंब व्यवस्था सरकारने सुरू केली. तीही परवान्यांची बेसुमार खैरात करून. जरी रेंट अ बाईकसाठी देण्यात अगदी ५ पासून ५० पर्यंत परमिट आली. ही परमिट (परवाने) घेणारे कोण होते, तर गडगंज संपत्ती असणारे किंवा उद्योगपती. त्यांचे राजकीय संबंध दृढ असल्याने सर्वसामान्य पायलट एकाकी पडले. गोवा मोटारसायकल टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केवळ पारंपरिक पद्धतीने प्रवासी वाहतूक न करता आपली मोटारसायकल रेंट अ बाईक प्रमाणे भाड्याने देण्याचा प्रस्ताव सरकार आणि परिवहन खात्याकडे ठेवला.

मात्र तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. उलट रेंट अ बाईकचे परवाने खिरापतीसारखे वाटण्यात आले आणि मोटारसायकल टॅक्सी व्यवसाय अडचणीत आला. या व्यवसायातील सर्व पायलट मध्यमवर्गीय किंवा गरीब घराण्यातील होते. त्यांचा उन्नतीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक होते. पण, तसे झाले नाही, अशी खंत ठाकूर यांनी व्यक्त केली.

सुरवातीला या व्यवसायासाठी दिले जाणारे परवाने गावाच्या नावाने दिले जायचे. पण ग्रामीण भागातील गावांमध्ये व्यवसाय चालेना म्हणून पायलट शहराच्या ठिकाणी त्या त्या गावांच्या तिठ्यावर येऊन व्यवसाय करायचे. त्यातही अडचणी येऊ लागल्याने ठाकूर यांनी गावांऐवजी संबंधित पायलटच्या व थांब्यांच्या नावाने परमिट करून घेतले. जेणेकरून त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांना ते पुन्हा मिळेल. यासाठी ठाकूर यांनी राज्यात मोटारसायकल टॅक्सीचे ६४ थांबे सरकारकडून अधिसूचित करून घेतले होते.

अधिकारी म्हणतात परमिट बंद आहे

सुरेश ठाकूर म्हणाले, या व्यवसायात तरुण यायला बघतात, त्यांनी यायला हवे. पण अधिकारी मोटारसायकल टॅक्सीची परमिटे देत नाहीत. परमिट बंद आहेत, असे साचेबद्ध उत्तर त्यांच्याकडून मिळते. एखाद्याला परमिट मिळवून देण्यासाठी संघटना परिवहन खात्याला ना हरकत प्रमाणपत्रही देते.

थांबे आहेत; पण माणसे नाहीत

२००३ च्या सुमारास पायलटांचे ६४ थांबे होते. एकेका ठिकाणी २०-२५ पायलट असायचे. त्या सर्वांना प्रवासी भाडे मिळायचे. राज्यात साडेसहा ते सात हजार पायलट होते. पण, आता ती संख्या २ हजार सुद्धा नाही. त्यामुळे थांबे आहेत; पण प्रवासी नसल्याने पायलट नाहीत अशी स्थिती आहे.

ते अटी पाळत नसल्याचा आम्हाला फटका

रेंट अ बाईकचे परवाने देताना संबंधितांना त्यांच्या खासगी जागेत बाईक उभ्या करण्याची, त्यांचे स्वतंत्र कार्यालये असण्याची आणि परदेशी चलन एक्सचेंज करण्याची सुविधा असण्याची अट घातलेली असते. मात्र, त्या अटी कुणीच पाळत नाहीत. त्याचा फटका आमच्या व्यावसायिकांना बसतो. गेली २५ वर्षे मी लढा दिला, देत आहे. पण, रेंट अ बाईक व्यवसाय धनाढ्यांच्या हातात गेल्याने व त्यांचे राजकीय लागबंधे असल्याने आमची ताकद अपुरी पडते, अशी भावना सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT