Book Pudhari
गोवा

Indian Book of World Records | एका गोमंतकीय लेखकाचा विश्वविक्रम

Indian Book of World Records | एका वर्षात 103 पुस्तके लिहून प्रा. आत्माराम गांवकर यांच्या नावावर विश्वविक्रम. त्याच बरोबर त्यांची कन्या नीरजा गांवकर तिच्या नावावर एका दिवशी सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करण्याचा दुसरा विश्वविक्रम...

पुढारी वृत्तसेवा

बिचोली : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल घडवण्याची ताकद असलेल्या १०३ पुस्तकांचे साहित्य गोमंतकीय लेखकाने निर्माण केले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी आपल्या पत्नी, मुले यांच्या सहकार्याने अथक परिश्रम घेत ही ज्ञानयात्रा पूर्ण केली. त्यांच्या या कार्याची दखल केवळ समाजानेच नव्हे, तर इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही घेतली आहे.

अनेक मान्यवरांनी या ऐतिहासिक साहित्यनिर्मितीचे कौतुक केले आहे. अशा प्रकारची ज्ञानसमृद्ध साहित्यनिर्मिती ही राष्ट्रनिर्मितीची खरी ताकद असून, प्रा. आत्माराम वामन गांवकर यांनी उभारलेली ही साहित्यचळवळ भविष्यातील शिक्षणव्यवस्थेसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरेल.

इतिहास घडविणारे क्षण वारंवार येत नाहीत. काही क्षण असे असतात की, ते एका व्यक्तीच्या यशापुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या अभिमानाचा विषय बनतात. असाच एक सुवर्णक्षण शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वा. हिराबाई झांटये मेमोरियल सभागृह, डिचोली येथे साकार होणार आहे.

या दिवशी शिक्षण, साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील अभूतपूर्व कार्याची दखल घेत आयोजित करण्यात आलेल्या विश्वविक्रम गौरव सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी प्रत्येक गोमंतकीयाला मिळणार आहे.

प्रा. आत्माराम गांवकर आणि त्यांची कन्या कु. नीरजा गांवकर यांनी शिक्षण, साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात केलेल्या अभूतपूर्व कार्यामुळे जागतिक स्तरावर मानाचा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. प्रा. गांवकर यांनी गेली ३६ वर्षे शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य करत हजारो शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.

अभियंता, संशोधक, प्राध्यापक, लेखक, मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. मात्र त्यांची खरी ओळख ही समाज परिवर्तनासाठी शिक्षणाला आयुष्य अर्पण करणारा एक ध्येयवेडा शिक्षक ही आहे. शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ११२ पुस्तके लिहिली आहेत. एका वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत १०३ पुस्तकांचे लेखन करून ती एका दिवसात, एकाच ठिकाणी प्रकाशित करण्याचा अभूतपूर्व विश्वविक्रम ते करणार आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये शिक्षण अधिक परिणामकारक, अधिक आनंददायी आणि अधिक जीवनोपयोगी कसे होईल, याचा शोध घेतलेला दिसतो.

त्यांच्या लेखनातून आणि मार्गदर्शनातून शिक्षणाकडे पाहण्याची नवी दृष्टी समाजाला मिळाली आहे. शिक्षक प्रशिक्षण, पालक मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षणातील नवकल्पना यासाठी त्यांनी केलेले कार्य हजारो कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

त्यांच्या पुस्तकांनी अनेक शिक्षकांना नवे प्रयोग करण्याची प्रेरणा दिली, अनेक पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा दिली आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य निर्माण केले.

या ऐतिहासिक प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली ती त्यांची कन्या कु. नीरजा आत्माराम गांवकर. अवघ्या १९ व्या वर्षी लेखिका, संपादक, ग्राफिक डिझायनर आणि प्रकाशक म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासून पुस्तकांच्या सहवासात वाढलेल्या नीरजाने वाचन, लेखन आणि प्रकाशन या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे.

तिने स्वतः पुस्तके लिहिली, विविध साहित्याचे संपादन केले आणि आधुनिक प्रकाशन तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान व साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. एका दिवसात एका ठिकाणी सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशिका म्हणून तिचे नाव विश्वविक्रमात नोंदविले जाणार आहे.

हा विश्वविक्रम प्रत्येक गोमंतकीयासाठी अभिमानाचा विषय ठरेल. ज्ञान, साहित्य आणि संस्कार यांचा दीप पुढील पिढ्यांसाठी प्रज्वलित करणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात आपली उपस्थिती हीच या कार्याला खरी मानवंदना ठरेल.
आनंद मोनू पंचवाडकर, सांगे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT