Child Education Tips | शिक्षण : ओझ्याकडून गोडीकडे...

Child Education Tips |
Child Education Tips | शिक्षण : ओझ्याकडून गोडीकडे...Pudhari
Published on
Updated on

वीरेंद्र सोनवणे

अभ्यास ओझे न वाटता आनंददायी अनुभव कसा बनेल, यासाठी पालक, शिक्षक आणि घरातील वातावरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले की, घराघरांत उत्साहाचे वातावरण निर्माण होते. नवीन पुस्तके, कोऱ्या वह्या, नवीन दप्तर आणि नवीन वर्ग यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसतो. मात्र काही दिवस उलटताच हा उत्साह हळूहळू कमी होऊ लागतो. अभ्यास, गृहपाठ, चाचण्या आणि परीक्षांचे दडपण वाढत जाते. काही मुले सुरुवातीपासून नियमित अभ्यास करतात, तर अनेक मुले परीक्षा जवळ आल्यावरच पुस्तक उघडतात. अशा सवयीमुळे अभ्यास हा आनंद न राहता ओझे बनतो. म्हणूनच मुलांना अभ्यासाची गोडी लावणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे.

अनेक पालकांना वाटते की, मुलाने भरपूर वेळ पुस्तकांसमोर बसले म्हणजे तो अभ्यास करतो. प्रत्यक्षात अभ्यासाचा दर्जा महत्त्वाचा असतो, कालावधी नव्हे. रोज थोडा वेळ मन लावून केलेला अभ्यास आणि परीक्षेच्या तोंडावर केलेली घाईघाईची उजळणी यामध्ये मोठा फरक असतो. नियमित अभ्यासामुळे विषय समजतो, विचारशक्ती विकसित होते आणि आत्मविश्वास वाढतो. उलट शेवटच्या क्षणी केलेला अभ्यास केवळ गुण मिळवण्यासाठी उपयोगी पडतो; ज्ञान मात्र दीर्घकाळ टिकत नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात तीन ते सहा वर्षांचा काळ मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर बालवाडी आणि वरिष्ठ बालवाडी या काळात मुलांना केवळ अक्षरे आणि अंक शिकवणे पुरेसे नसते. या वयात त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड, प्रश्न विचारण्याची सवय, निरीक्षण करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होणे अधिक आवश्यक असते. त्यामुळे शाळा निवडताना केवळ नाव, प्रसिद्धी किंवा शुल्क पाहण्यापेक्षा तेथील वातावरण, खेळातून शिक्षण, शिक्षकांचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला दिले जाणारे महत्त्व याकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे. बालपणी घातलेला शिक्षणाचा मजबूत पाया पुढील संपूर्ण शैक्षणिक प्रवास अधिक सोपा करतो.

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याची जबाबदारी केवळ शाळेची नसून पालकांचीही तितकीच आहे. अभ्यास म्हणजे शिक्षा किंवा सक्ती नसून ज्ञानाचा आनंद आहे, ही भावना मुलांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक मुलाची आवड, क्षमता आणि शिकण्याची गती वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्या मुलांशी तुलना करण्याऐवजी त्याच्या स्वतःच्या प्रगतीचे कौतुक करणे अधिक महत्त्वाचे आहे. कौतुकाचे काही शब्द मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि आणखी चांगले करण्याची प्रेरणा देतात. घरातील वातावरणाचाही अभ्यासावर मोठा परिणाम होतो. घरात वाचनाची सवय, संवाद आणि सकारात्मक वातावरण असेल तर मुलांनाही अभ्यासाविषयी आपुलकी वाटते. अभ्यासासाठी ठरावीक वेळ असावा; पण त्याचबरोबर खेळ, विश्रांती, छंद आणि कुटुंबासोबतचा वेळ यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. सतत अभ्यास करण्याचा आग्रह धरल्यास मुलांच्या मनात अभ्यासाविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. आजच्या डिजिटल युगात भ्रमणध्वनी, दूरदर्शन आणि इतर माध्यमे मुलांच्या जीवनाचा भाग बनली आहेत. या साधनांचा योग्य वापर केला तर ज्ञान मिळवण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकतात. मात्र त्यांचा अतिरेक अभ्यासातील एकाग्रता कमी करतो. त्यामुळे पालकांनी केवळ बंदी घालण्याऐवजी योग्य वेळेचे नियोजन करून मुलांसोबत वाचन, गोष्टी, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. मुलांना पर्याय दिल्यास ते अभ्यास आणि मनोरंजन यामध्ये योग्य समतोल साधायला शिकतात. शिक्षक हे मुलांच्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असते. वर्गात विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण करणे, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणे, प्रयोग आणि कृतीतून शिकवणे तसेच पाठांतराऐवजी समजून घेण्यावर भर देणे, यामुळे मुलांचा अभ्यासावरील विश्वास वाढतो. आनंददायी शिक्षण हा अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

शिक्षणाचा खरा उद्देश केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवणे नाही; तर विचार करणारा, संवेदनशील, जबाबदार आणि आत्मविश्वासू नागरिक घडवणे हा आहे. बालपणी लागलेली नियमित अभ्यासाची आणि वाचनाची सवय आयुष्यभर उपयोगी पडते. म्हणूनच मुलांवर गुणांचे दडपण न आणता त्यांच्यात शिकण्याची जिज्ञासा, प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि ज्ञानाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. जेव्हा अभ्यास सक्तीचा न राहता आनंदाचा अनुभव बनेल, तेव्हाच शिक्षणाचा खरा अर्थ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचेल. शिक्षण ओझे न वाटता आयुष्य समृद्ध करणारा सुंदर प्रवास ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news