२७ वा गोवा युवा महोत्सव १७ व १८ जानेवारीला फर्मागुडी येथे
सुमारे १,५०० युवक-युवतींचा विविध कोंकणी कला प्रकारांत सहभाग
एकूण १५ सांस्कृतिक व कलात्मक स्पर्धांचे आयोजन
कोंकणी साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना नावांनी गौरव
राजभाषा संचालनालयाकडून महोत्सवाला आर्थिक पाठबळ
फोंडा : पुढारी वृत्तसेवा
कोकणी भाषा मंडळाचा २७ वा गोवा युवा महोत्सव १७ व १८ जानेवारी रोजी फर्मागुडी येथील जी. व्ही. एम्स महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. अंत्रुज घुड्यो, बांदोडा व गोवा विद्याप्रसारक मंडळ फोंडा या संस्था महोत्सवाच्या सहआयोजक असून, गोवा सरकारचे राजभाषा संचालनालय महोत्सवाला आर्थिक पाठबळ देणार आहे.
संपूर्ण गोव्यातून महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये व संस्था मिळून तीसहून जास्त स्पर्धक संघ महोत्सवात सहभागी होणार असून १२०० ते १५०० च्या आसपास युवक / युवती आपली कला सादर करणार आहेत. महोत्सवात एकंदरीत १५ स्पर्धा आयोजित केल्या असून काही स्पर्धा केवळ शैक्षणिक संस्थांसाठी, काही केवळ क्लब वा संस्थांसाठी व काही स्पर्धा दोन्ही गटांसाठी खुल्या आहेत.
लोकमांड, गीत गायतना, जुगलबंदी, फास्की, लोकनाट्य, खेळ, आयलें तशें गायलें, ई-वेस्ट शिल्पकला बांधणी, प्रस्नमाची, रंगीत खोमीस, कोंकणी लघु चित्रपट, मुस्तायकी, नाच नाच नाचुया, नमन व रीळ अशा स्पर्धांमधून स्पर्धक संस्था आपली कला सादर करणार आहेत. महोत्सवाच्या स्थळाला नुकतेच कालवश झालेले कोंकणी भाषेतील एक ख्यातनाम लेखक माणिकराव गावणेकर यांचे नाव देण्यात आले आहे.
तसेच महोत्सवाच्या प्रमुख व्यासपिठाला कोंकणीतील जेश्ठ तियात्रिस्त मायक मेहता, दुसऱ्या व्यासपिठाला तियात्रिस्त लुईझा फेर्नांडीस, प्रवेशद्वाराला कोंकणी कवी अशोक भोंसले, प्रदर्शन दालनाला नाट्य कलाकार जगदीश वेरेंकर व चौकाला नाट्य दिग्दर्शक दिगंबर सिंगबाळ यांची नावे देण्यात आली आहेत.