पणजी : पोर्तुगीजांनी गोव्यातील हजारो मंदिरे तोडली, हजारो लोकांचे धर्मांतर केले. गोवा ही देवभूमी आहे. हिंदूंनी एकत्र येऊन भक्ती करू नये, भजन करू नये, यासाठी हे अत्याचार करण्यात आले. मात्र, केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारने सनातन संस्कृती संवर्धनासाठी काम सुरू केले आहे. युवा पिढी सनातनी व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. राज्यातील जी मंदिरे तोडली गेली, त्यांचे सगळ्यांचे प्रतिनिधिक असे एक भव्य मंदिर दिवाडी येथे कोटीतीर्थ स्थापन करून बांधले जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सोमनाथ मंदिराच्या फेर बांधणीला ७५ वर्षे झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सोमनाथ स्वाभिमान पर्व सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून जुने गोवे येथील गोवेश्वर महाशिव मंदिर परि-सरात परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्रा चार्य स्वामी महाराज यांच्या पीठावर सोमवारी कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्व या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, नरेंद्राचार्य पीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकार आणि नागरिक यांच्या समन्वयाने वेर्णा येथे भव्य मंदिर पुन्हा बांधले गेले. त्याच धर्तीवर कोटीतीर्थावर पाडलेल्या मंदिरांचे प्रतिमंदिर उभारले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
... आता पर्यटक मंदिराला देताहेत भेट
डॉ. सावंत म्हणाले की, गजनीने सोमनाथ मंदिर तोडल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा बांधले. गोव्यातही तोच प्रकार पोर्तुगीजांनी केला होता. मंदिरे तोडली गेली, धर्म परिवर्तन करण्यासाठी लोकांचा छळ केला. त्यामुळे अनेक गोवेकर आपले देव घेऊन परराज्यांमध्ये स्थलांतरित झाले. जुने गोवे येथे नरेंद्र महाराजांनी स्थापन केलेल्या गोवेश्वर महाशिव आणि बारा ज्योतिर्लिंग मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत, पूर्वी पर्यटक येथील चर्च पाहण्यासाठी येत होते. आता या मंदिरातही मोठ्या प्रमाणात ते भेट देत असून ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.