पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोद्वारे (ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी) आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, २०२५ च्या श्रेणी ४ मध्ये गोवा राज्याला दुसरे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर आणि ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमतेच्या उपक्रमांसाठी जबाबदार असलेले राज्य नियुक्त संस्थेचे प्रमुख मयूर हेदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार (एनईसीए) हे भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (बीईई) द्वारे स्थापित वार्षिक पुरस्कार आहेत. हे पुरस्कार राज्ये, केंद्रशासित प्रदेश, संस्था, उद्योग आणि इतर घटकांनी ऊर्जा कार्यक्षमता, संवर्धन आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दिले जातात.
१,५९६ कुटुंबांनी घेतला लाभ
पीएम सूर्य घर मोफत वीज योजने अंतर्गत राज्यातील सुमारे ८०० कुटुंबांचे वीज बिल शून्य आले आहे. या कुटुंबांनी स्वतःच्या घरावर सौरऊर्जा पॅनल बसवून वीज तयार केली. या योजनेखाली लाभार्थ्यांना ८ कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. राज्यात आतापर्यंत १,५९६ कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यातील ७९८ कुटुंबांनी सरकारी विजेवर अवलंबून राहणे थांबवले आहे, असे नाईक म्हणाले.
जनतेने लाभ घ्यावा
संपूर्ण गोव्यात सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सौरऊर्जा वापरावर भर देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विविध माध्यमांमधून प्रबोधन आणि जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सौरऊर्जा वापरासाठी सरकारतर्फे अनुदान देण्यात येत असून जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मयूर हेदे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर केले आहे.