पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेले काही दिवस तापमानात घट दिसून येत असली, तरी रात्री थंडी व दिवसा उष्णता असा प्रकार सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कोरडे हवामान कायम आहे.
अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान दाबोळी येथे १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर पणजी येथे सर्वाधिक कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी रात्री थंडी होती.
मात्र, पुढील चार दिवसांत ताममानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात हळूहळू १-२ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ८ जानेवारीपर्यंत राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याच कालावधीत पहाटेच्या वेळी काही ठिकाणी धुके राहण्याचा इशारा दिला आहे.