Arrested Pudhari
गोवा

Sattari Waterfall Student | धबधब्यावर विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरण: 2 टूर ऑपरेटरना अटक, 4 शिक्षकांवर गुन्हा दाखल!

Sattari Waterfall Student | चार शिक्षकांवर गुन्हा नोंद; मुलांच्या सुरक्षेशी खेळ केल्याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यातील बंदी असलेल्या तोणीर काजरेघाट येथील धबधब्यावर सहलीसाठी आलेल्या वास्कोतील विद्यार्थ्यांमधील राहुल बिंद (वय १७) या विद्यार्थ्याचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवला, तर दोन टूर ऑपरेटरविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली आहे. त्यांच्यावर सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे.

सत्तरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मीकांत बी. कुट्टीकर यांनी वाळपई पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत दीपविहार हायर सेकंडरी स्कूल, मुरगाव येथील चार शिक्षक आणि दोन टूर ऑपरेटर (गाईड) यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे आणि निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत निधी शिर्लेकर, विद्या गावडे, ब्लांश फर्नांडिस, यशवंत कंकणावर या शिक्षकांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्यासोबत आलेल्या टूर ऑपरेटर आदित्य दळवी, (रा. शेट्येवाडो, म्हापसा), मंजुनाथ याम्मियार, (रा. दुलेर, म्हापसा) यांच्या नावाची नोंद आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विदेश पिळगावकर यांच्या देखरेखीखाली आणि उपअधीक्षक श्रीदेवी बीव्ही व पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलिस तपास करीत आहेत.

दरम्यान, या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सत्तरीचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी सांगितले की, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. अशा प्रकारे शिक्षकांनी निष्काळजीपणा केल्यामुळे एका विद्यार्थ्याचा जीव गेलेला आहे. पावसाळी पर्यटनाची माहिती नसल्यांनी स्थानिकांशी संवाद साधणे गरजेचे आहे.

संबंधित शिक्षकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संदर्भाची माहिती घेतली असती तर कदाचित हा अपघात घडला नसता. मात्र शिक्षकांचा निष्काळजीपणा विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला. सामाजिक दृष्टिकोनातून याचा संदर्भाची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुरगाव सडा दीप बिहार शाळेसमोर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीय व नागरिकांनी केलेली गर्दी.

दीप बिहारसमोर आंदोलन

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव सडा दीप बिहार उच्च माध्यमिक विद्यालयासमोर मृत विद्यार्थ्याच्या संतप्त कुटुंबीयांनी आंदोलन केले.
तोणीर-काजरेघाट येथील शुक्रवारी ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी राहुल बिंद (रा. बायणा, वास्को) याचा बुडून मृत्यू झाला होता. शनिवारी संतप्त कुटुंबीयांनी व स्थानिकांनी शाळा व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच बिंद कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. शाळा व्यवस्थापनानेही आपली बाजू मांडली. स्थानिक लोक जबाबदारीची मागणी करत राहिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली.
दरम्यान, मृत राहुल बिंद याच्या मृतदेहावर शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक वास्को पोलिस स्थानकात आले. यावेळी दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पार्थिवावर खारीवाडा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT