पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांवरून गेल्या पाच महिन्यांत १५९.०१ टन कचरा हटविण्यात आला आहे. यापैकी सुमारे ४५ टक्के कचरा उत्तर गोव्यातील रस्त्यांच्या कडेला आढळून आला. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळामार्फत हा कचरा नियमितपणे संकलित करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिली.
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील महामार्ग स्वच्छता मोहिमेअंतर्गत यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण १५९.०१ टन कचरा गोळा करण्यात आला.
यामध्ये उत्तर गोव्यात ७३.०३ टन, दक्षिण गोव्यात ४५.८५ टन आणि मध्य गोव्यात ४०.२१ टन कचरा संकलित करण्यात आला. ही आकडेवारी राज्यातील महामार्गांवर कचरा टाकण्याचे प्रमाण अद्यापही चिंताजनक असल्याचे दर्शवते. विशेषतः पर्यटकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या भागांत ही समस्या अधिक गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि अधिसूचित जिल्हा रस्त्यांवरील कचरा नियमितपणे गोळा करणे, त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करणे आणि त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे, या उद्देशाने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने ही महामार्ग स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. सध्या ही मोहीम उत्तर, मध्य आणि दक्षिण गोवा मिळून सुमारे ४१९ किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्यावर राबविली जात आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १० मीटरच्या परिसरातील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाते आणि अधिकृत प्रक्रिया केंद्रांमध्ये पाठविले जाते. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी प्रत्येक कचऱ्याच्या पोत्यावर क्यूआर कोड लावण्यात येतो. पोते भरल्यानंतर त्याचे स्कॅनिंग करून डिजिटल नोंद ठेवली जाते.
तसेच कचरा उचलण्यापूर्वी आणि नंतरचे जिओटॅग केलेले छायाचित्र, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी जीपीएस-सक्षम ओळखपत्रे वापरण्यात येत आहेत. त्यामुळे कामावर रिअल-टाइम देखरेख ठेवणे शक्य होत आहे.
या प्रकल्पात प्रत्येक ३५ किलोमीटरसाठी एक वाहन, चार स्वच्छता कर्मचारी आणि एक चालक नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय महिन्यातून दोन वेळा प्रत्येक ४ किलोमीटरसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून मोठे कचऱ्याचे ढीग होण्यापूर्वीच कचरा हटविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
"राज्यात कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये, यासाठी अनेक पातळ्यांवर काम सुरू आहे. पंचायती आणि पालिकांच्या माध्यमातून जनजागृतीसोबत कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तरीही लोक कचरा उघड्यावर टाकत आहेत. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने राज्यातील सर्व रस्ते कचरामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी कचरा उघड्यावर न टाकता गोवा हे कचरामुक्त राज्य करावे, असे आवाहन गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिश अडकोणकर यांनी पुढारीशी बोलताना केले."