Summary
मोले पाठोपाठ पत्रादेवी, केरी, पोळे येथेही लक्ष
गोव्यात या, मजा करा. पण, नियम पाळा, दंड टाळा...
पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि दंड प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी राज्य सरकारने केरी, पत्रादेवी आणि पोळे या महत्त्वाच्या चेक नाक्यांवर (गोवा व्हेईकल ऑथेन्टिकेशन सिस्टम/गोवा वाहन प्रमाणीकरण प्रणाली) प्रणाली कार्यान्वित केली आहे.
ही प्रणाली मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून कार्यान्वित झाली आहे. ही आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आयटीएमएस म्हणजेच इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) म्हणूनही काम करणार आहे.
गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे (उदा. नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक), विमा आणि पीयूसी प्रमाणपत्र स्वयंचलित पद्धतीने तपासणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास ई-चलन जारी करणे यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे.
ही प्रणाली वाहनांच्या नंबर प्लेट्स स्कॅन करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि डॅशकॅम तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. वाहने चेकपोस्टवर पोहोचताच, ही यंत्रणा नंबर प्लेट वाचते आणि वाहन आणि डीजी लॉकरसारख्या सरकारी डेटाबेससोबत माहितीची पडताळणी करते.
अवैध कागदपत्रे आढळल्यास, मोटर वाहन कायद्यानुसार वाहन मालकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर थेट एसएमएसद्वारे ई-चलन पाठवले जाते. ही प्रणाली मंगळवारी मध्यरात्रीपासून सीमेवरील केरी, पत्रादेवी आणि पोळे या महत्त्वाच्या तपासणी नाक्यांवर कार्यान्वित करण्यात आली आहे.
मोले येथे याआधीच प्रायोगिक तत्त्वावर नाके सुरू करण्यात होते, तर पत्रादेवी येथे ७नोव्हेंबरपासून तपासणी करण्याचे नियोजन होते. मात्र, ते लांबणीवर पडून मंगळवारपासून कार्यान्वित झाले. या प्रणालीद्वारे खासगी वाहनांना ऑनलाइन दंडाची पावती येईल, तर व्यावसायिक वाहनांना दंड भरल्याशिवाय तपासणी नाका पार करताच येणार नाही. नाक्यावरील इलेक्ट्रिक लाठी तुमचा प्रवास रोखून धरणार आहे.
दंड भरल्यावर लाठी वर जाईल आणि पुढच्या प्रवासाचा तुमचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक नाक्यावर खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी येण्या जाण्याचे स्वतंत्र पॅसेज तयार करण्यात आले आहेत. राज्यात चार ठिकाणच्या सीमांवर असे तपासणी नाके सुरू झाले आहेत. या नाक्यांवर तपासणी होऊन तुमचे वाहन एकदा गोव्यात आले की, पुन्हा तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही.
यासाठी राज्य सरकारने बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर त्रयस्थ एजन्सी नेमली आहे. एजन्सीमार्फत प्रत्येक नाक्यावर चार कॅमेरे बसवले आहेत. तसेच खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी वेगवेगळे पॅसेज बनवले आहेत. त्या त्या पॅसेजमधून जाणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग नंबरप्लेटवरून केले जाईल. कॅमेरा ई वाहन अॅपशी जोडला असल्याने आरसी बुक, पीयूसी आणि इन्शुरन्स यांची वैधता लगेच नाक्यावरील डिजिटल बोर्डवर डिस्प्ले होईल.
डिजिटायझेशनमुळे पर्यटकांचा त्रास कमी होणार आहे. राज्याबाहेरून येणारी वाहने वाहतूक पोलिसांकडून कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली ठिकठिकाणी थांबवली जात होती. यात आर्थिक व्यवहारही व्हायचे. त्यामुळे पर्यटकांना मनस्ताप व्हायचा आणि प्रवासाचा वेळ वाढायचा. आता वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले, तरच वाहतूक पोलिस वाहने थांबवणार आहेत. साहजिकच डिजिटायझेशनमुळे राज्यातील वाहतूक बदलाची आणि त्रासरहित प्रवासाची व पारदर्शकपणाची माहिती देशभर पोहोचेल.
सुरुवातीला काही दिवस वाहतूक पोलिस खासगी वाहने, तर आरटीओ अधिकारी व्यावसायिक वाहनांच्या कागदपत्रांची मशीनच्या सहाय्याने मॅन्युअली तपासणी करतील. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील त्यांना तत्काळ दंड आकारला जाईल. हळूहळू ही तपासणी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) द्वारे कॅमेऱ्याच्या मदतीने केली जाईल. तथापि, सुरुवातीपासूनच खासगी आणि व्यावसायिक वाहनांची तपासणी कॅमेऱ्याद्वारे केली जावी, अशी मागणी परिवहन विभागाने संबंधित एजन्सीकडे केली आहे.
कागदपत्रे पूर्ण असली, तरीही कारवाई होऊ शकते नाक्यावरून वाहन आत आल्यावर पुन्हा तुमच्या कागदपत्रांची तपासणी होणार नसली, तरी अन्य वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही अतिवेगाने गाडी चालवली, सीट बेल्ट लावला नसेल, हेल्मेट घातले नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागेल, अशी माहिती पत्रादेवी येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.