

पणजी : पुढारी वृत्तसेवा
माविन गुदिन्हो हडफडे येथील रोमियो लेनमधील बर्च या नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले की, क्लबच्या बांधकाम पाडण्याच्या आदेशाला दिलेल्या स्थगितीशी राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही.
सरकारने या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मंत्री गुदिन्हो म्हणाले की, संबंधित नाईट क्लबचे बांधकाम पाडण्याच्या आदेशाला स्थगिती अर्धन्यायिक प्राधिकरणाने (क्वाझी ज्युडिशियल) दिली होती.
या स्थगितीशी सरकारचा काहीही संबंध नाही. हडफडे पंचायतीने या नाईट क्लबला गेल्या वर्षापूर्वीच नोटीस देऊन बांधकाम बेकायदेशीर असल्याची तसेच ते कमकुवत साल्ट-पॅन (मीठागर) भागावर करण्यात आल्याची सूचना दिली होती. तसेच पाडण्याचा आदेशही जारी केला होता. तथापि, स्थगितीमुळे कारवाई पुढे ढकलली गेली आणि या कालावधीतच शनिवारी भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली, असे ते म्हणाले.
यापुढे अशा प्रकारचे दुर्लक्ष पुन्हा होऊ नये यासाठी सरकार आता नवी मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार करणार आहे. प्रशासन, पंचायती आणि संबंधित विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी याची आखणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
हडफडे येथील आग दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्षाने सरकार व प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुदिन्हो यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.