वास्को : पुढारी वृत्तसेवा
येथील मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोरच्या पदपथांवर झोपणारे, आरडाओरडा करणारे, संपूर्ण पदपथ आपल्या ताब्यात घेऊन त्याची दुदर्शा करणारे भटके लोक चर्चेचा विषय झाला आहे.
मच्छरदाणीचा वापर करून त्या पदपथावर बिनधास्तपणे झोपणाऱ्या या भटक्या व्यक्तींवर प्रशासन कारवाई का करीत नाही, असा पश्न विचारण्यात येत आहे. सदर भटके लोक पूर्वी मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या व्हरांडामध्ये झोपत होते. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे मामलेदार कार्यालयातील कर्मचारीही भटक्या लोकांनी केलेल्या गलिच्छपणामुळे वैतागले होते. मात्र, मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करताना त्या व्हरांडाला सर्व बाजूनी ग्रिल्स लावण्यात आल्याने भटक्या लोकांचे आत झोपणे बंद झाले होते. त्यानंतर त्यांनी समोरच्या पदपथावरच ठाण मांडले. पावसाळ्यात ते कोठेतरी आडोशा घेतात. परंतू पावसाळा संपल्यावर ते पदपथावर आपला संसार मांडतात. तेथेच अंघोळ करणे, कपडे वाळत घालणे असे प्रकार करतात.
याप्रकरणी आवाज उठवूनही काहीच फायदा होत नाही. तेथील टूरिस्ट टॅक्सीवाल्यांना या गोष्टींचा अतिशय त्रास होत आहे. याप्रकरणी आवाज उठवूनही अद्याप कारवाई झाली नाही. या भटक्या लोकांना सामाजिक संस्था जेवण देतात.
त्यामुळे त्यापैकी बरेचजण काहीच कामधंदा न करता दिवसभर त्या पदपथावर बसलेले, झोपलेले आढळतात. तेथे काही वेळा मद्यपान करून शिवीगाळ करणे, मारामाऱ्या करणे आदी गोष्टी होतात. माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.