पर्वरी : शेखर वायंगणकर
राज्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ एवढी वाढली आहे की वाहतूक खात्याच्या आणि वाहतूक पोलिस खात्याच्या नियंत्रणाबाहेर ती गेल्याचे दृश्य हल्ली दिसते आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना अडविणे त्यांना तालाव देणे हेच अवघे काम पोलिसांच्या हाती राहिले आहे.
परराज्यातून येणारे पर्यटक, प्रेमी युगले रेंट बाईकवरून वाटेल तसे रस्त्यावर दुचाकी चालवित असतात. शिवाय काही टारगट मुले धूम स्टाईल वेगाने दुचाकी चालवीत असतात, त्यामुळे अनेकवेळा ते गंभीर अपघातात सापडतात. काही वेळा त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यूही घडतो. खरतर वाहतूक खात्यासमोर ही चिंतेची बाब आहे.
परंतु संबंधित दोन्ही खाती ठोस उपाययोजना करीत नसल्यामुळे अपघाताचे पर्यायाने राज्यातील सर्वच मार्गावर मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सात वर्षांपूर्वी वाहतूक खात्याने स्पीड रडार कॅमेरे येथील मांडवी पुलावर बसवून पुलावरील वेगात वाहने हाकणा-यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणले होते.
पुलावरील ४० वेग मर्यादेचे उल्लंघन कारणाऱ्यांवर चलन देऊन कारवाई करण्यात येत होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये वाहतूक खात्याने सदरहू योजना कार्यान्वित केली होती. परंतु केवळ अल्पवधीतच त्यांना ती पद्धत गुंडाळावी लागली.
बंद करण्याचा हेतू आजपर्यंत खात्याने जाहीर केला नाही. खरतर, स्पीड रडार कॅमेराची राज्यातील पुलांवर किंवा महामार्गावर आवश्यकता आहे, जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि वेगाने वाहन हाकणऱ्यांना शिस्त लागेल. वाहतूक खात्याच्या आकडेवारीनुसार गोव्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.