पणजी : पुढारी वृत्तसेवा
जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत रेल्वेमार्गे गोव्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ६.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण १९,८७,८६२ प्रवासी रेल्वेने गोव्यात दाखल झाले, तर २०२५ मधील याच कालावधीत ही संख्या १८,६०,५६८ इतकी होती, अशी माहिती गोवा पर्यटन खात्याने दिली.
पर्यटन खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२६ मधील ही वाढ २०२४ च्या तुलनेतही ६.५ टक्के अधिक आहे. त्यामुळे गोवा हे भारतातील सर्वाधिक सहज उपलब्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक बळकट करत असल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, या उपलब्ध आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, रेल्वेमार्गे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ ही गोव्याबद्दल पर्यटकांचा वाढता विश्वास दर्शवते.
वाढलेली रेल्वे संपर्क व्यवस्था, समुद्रकिनाऱ्यांपलीकडे विस्तारलेले पर्यटन अनुभव आणि दर्जेदार पर्यटनावर दिला जाणारा भर यामुळे अधिकाधिक पर्यटक पुन्हा गोव्याला भेट देत आहेत.
वारसा, अध्यात्म, ग्रामीण पर्यटनाचाही विस्तार
वारसा, अध्यात्म, ग्रामीण पर्यटन, आरोग्य पर्यटन, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि मान्सून पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये पर्यटन सेवांचा विस्तार सुरू असून, यामुळे ही सकारात्मक वाढ कायम राहील, असा विश्वासही खंवटे यांनी व्यक्त केला.